श्री चामुंडराये करवियले, गंगाजे सुत्ताले करवियले
ज्ञात असलेल्यांपैकी मराठीतील पहिला लेख हा श्रवणबेळगोळ येथे आढळून येतो. श्रवणबेळगोळ येथील भगवान बाहुबली मूर्तीच्या पायाजवळ ‘श्री चामुंडराये करवियले, गंगाजे सुत्ताले करवियले’ ही अक्षरे कोरली आहेत.
श्रवणबेळगोळचा इतिहास थेट इ. स. पूर्व तिसऱ्या शतकात जातो. या वेळी अखंड भारतावर चंद्रगुप्त मौर्य यांचे साम्राज्य होते. ते भारतवर्षाचे पहिले सम्राट ठरले. विखुरलेल्या भारताला बऱ्यापैकी त्यांनी एकत्र आणले. त्यांच्या साम्राज्याच्या सीमा गांधारपासून ते कामरूपपर्यंत होत्या. कलिंग आणि दक्षिणेतील छोटा भाग वगळता सारा भारत त्यांनी आपल्या अंमलाखाली आणला होता.
आपल्या राज्यातील जनतेबद्दल त्यांना कणव होती. त्यामुळे त्यांनी जनतेसाठी अनेक सुविधा निर्माण केल्या, पण पाटलीपुत्र म्हणजे आजच्या बिहार, झारखंड विभागांत सलग बारा वर्षांचा दुष्काळ पडला. लाखो लोक आणि जनावरे मृत्युमुखी पडली. अनेकांचे हाल झाले. त्या भयानक दुष्काळानंतर आलेल्या विरक्तीतून चंद्रगुप्त मौर्य यांनी दक्षिणेकडे प्रस्थान ठेवले. चंद्रगुप्त आणि त्यांचे गुरू आचार्य भद्रबाहू हे श्रवणबेळगोळ येथे आले. सर्वसंग परित्याग करून चंद्रगुप्त मौर्य जैनमुनी बनले. ‘प्रभाचंद्र’ असे नाव त्यांनी धारण केले. तप, साधना करत सल्लेखना घेतल्यानंतर त्यांच्या जीवनकार्याची इतिश्री झाली. ज्या डोंगरावर त्यांनी सल्लेखना घेतली तो डोंगर आज चंद्रगिरी या नावाने ओळखला जातो. या डोंगरावरील उंच भागांत त्यांच्या पायाचे ठसे आजही आहेत.
दृष्टिक्षेप
श्रवणबेळगोळला मराठीतील आद्य शिलालेख
दहाव्या शतकातील शिलालेखाला हजार वर्षे पूर्ण
चंद्रगुप्तांच्या महानिर्वाणानंतर तेराशे वर्षांनी मूर्ती कोरली
महाराष्ट्रातील नागरिकांच्या माहितीसाठी अक्षरे कोरली
चंद्रगिरी डोंगरासमोरच विंध्यगिरी डोंगर आहे आणि याच डोंगरावर भगवान बाहुबलींची ५८ फूट उंच मूर्ती कोरली आहे.
सम्राट चंद्रगुप्त मौर्यांच्या महानिर्वाणानंतर तब्बल तेराशे वर्षांनी बाहुबली मूर्तीची उभारणी झाली. एकाच अखंड पाषाणातून कोरलेली मूर्ती म्हणजे एक आश्चर्य आहे. जगात असे उदाहरण दुसरीकडे दिसत नाही. मूर्तीच्या पायाजवळ उजवीकडे मराठीत ‘श्री चामुंडराये करवियले, गंगाजे सुत्ताले करवियले’ अशी अक्षरे कोरली आहेत. हीच अक्षरे डाव्याबाजूस कन्नड आणि तमिळ भाषेतही कोरली आहेत.
गमतीची गोष्ट म्हणजे दहाव्या शतकात श्रवणबेळगोळ हे गाव पूर्णपणे कन्नड भाषिक परिसरात वसले होते आणि आहे. तेथून मराठी बोलणारा परिसर त्याकाळीही दूर होता आणि आजही आहे; मग प्रश्न पडतो की मराठीत हा लेख का लिहिला? तर त्याकाळी महाराष्ट्रात मोठ्या संख्येने असलेले जैनधर्मीय या मूर्तीचे दर्शन घेण्यास श्रवणबेळगोळला जात. तेथे ही मूर्ती कोणी कोरली, याची विचारणा करत. त्यामुळे मग कोणी कोरली, त्याची माहिती देण्याची गरज निर्माण झाली आणि मग मराठीतील पहिल्या शिलालेखाचा दहाव्या शतकात जन्म झाला. जो आजही सर्व मराठी सारस्वतांसाठी गौरवास्पद आहे.