बेकायदा वाळू वाहतूक; चार ट्रक ताब्यात
सांगली - कर्नाटकमधील उंब्रज येथून जतमध्ये चोरून आणण्यात येणाऱ्या वाळूवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापे घालून कारवाई केली. यामध्ये चार ट्रक आणि २२ ब्रास वाळू जप्त केली. याची एकूण किंमत २९ लाख ५४ हजार रुपये आहे. अवैध वाहतूक करणारे ट्रक आणि त्यांच्या चालक, मालकांना ताब्यात घेतले आहे.
सांगली - कर्नाटकमधील उंब्रज येथून जतमध्ये चोरून आणण्यात येणाऱ्या वाळूवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापे घालून कारवाई केली. यामध्ये चार ट्रक आणि २२ ब्रास वाळू जप्त केली. याची एकूण किंमत २९ लाख ५४ हजार रुपये आहे. अवैध वाहतूक करणारे ट्रक आणि त्यांच्या चालक, मालकांना ताब्यात घेतले आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक राजन माने यांना कर्नाटकमधील उंब्रज येथून जतमार्गे जिल्ह्यात चोरटी वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार श्री. माने यांनी विशेष तीन पथके तयार करून सापळा लावला. काल (ता. १०) रात्री बारा वाजण्याच्या सुमारास सातारा रोड जत मार्गावर एका मागोमाग एक असे चार ट्रक आले. त्यांना थांबवून ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये वाळू भरलेली दिसून आली. ट्रकचालकांकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र त्यानंतर त्यांनी ही वाळू उंब्रज (कर्नाटक) येथून आणल्याचे सांगितले.
वाळू चोरीची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी चारही ट्रक ताब्यात घेतले आणि पोलिस ठाण्याकडे घेऊन जात असताना ट्रक मालक त्यांची खासगी वाहने घेऊन आले. ट्रकच्या आडवे गाड्या मारून ते कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी बाकीचे पोलिस पथक तेथे आल्यानंतर ट्रक मालकांनी खासगी वाहने घेऊन पळ काढला.
पोलिस निरीक्षक राजन माने आणि त्यांच्या पथकांनी वाळूने भरलेले सहा चाकी दोन ट्रक आणि दहा चाकी दोन ट्रक असे चार ट्रक जत पोलिस ठाण्यात हजर केले. तेथे गुन्हा दाखल केला. शिवाजी गंगाराम मंडले (चालक, वर २७, रा. वाघोली, ता. कवठेमहांकाळ) आणि पिटू नाईक (मालक, रा. कवठेमहांकाळ), धनाजी कुंडलिक दोदले (वय २७, रा. सोरडी, ता. जत) आणि दादासाहेब हिपरकर (मालक, रा. जत), संतोष महादेव पाटील (वय २८, रा. शिरढोण, ता. कवठेमहांकाळ) आणि बंडू पाटील (मालक, रा. शिरढोण), जयकुमार लक्ष्मण फौडे (चालक, वय २३, रा. दुधेभावी, ता. कवठेमहांकाळ) आणि सचिन यमगर (मालक, रा. बिरनाळ, ता. जत) या सर्व ट्रक चालकांना अटक केली आहे. तर मालकांनी पळ काढला आहे. यातील ट्रक चालक शिवाजी मंडले याने स्वत:चे खोटे नाव सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्याचे मूळ नाव सतीश बाळासाहेब नाईक (वय ३०, रा. नागोळे, ता. कवठेमहांकाळ) असे आहे. त्यामुळे त्याच्यावर वाढीव कलम लावले आहे.
ही कारवाई निरीक्षक राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण शिंदे, महादेव नागणे, राहुल जाधव, राजू मुळे, संजय पाटील, शशिकांत जाधव, संग्राम जाधव, सचिन कणप, चेतन महाजन, अरुण सोकटे यांनी केली.