बार कौन्सिल निवडणूक - वैयक्तिक संपर्कावर ठरविणार सदस्य
कोल्हापूर - महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातून एकच उमेदवार देण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरल्यामुळे आता रिंगणातील वकिलांचा कस लागणार आहे. वैयक्तिक संपर्कच सदस्यपद मिळून देणार आहे.
कोल्हापूर - महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातून एकच उमेदवार देण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरल्यामुळे आता रिंगणातील वकिलांचा कस लागणार आहे. वैयक्तिक संपर्कच सदस्यपद मिळून देणार आहे. पाच वकील रिंगणात आहेत. आणखी नावे चर्चेत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या १५ फेब्रुवारी या शेवटच्या दिवशी ते रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. काही इच्छुकांनी ‘वेट ॲण्ड वॉच’ अशी भूमिका घेतली आहे.
निवडणुकीचे वारे वाहू लागल्यामुळे जिल्ह्यातील वकिलांत एकच चर्चा सुरू आहे. ‘बार कौन्सिल’ सर्किट बेंचसाठी आजपर्यंतची झालेली आंदोलने आणि त्यांतून झालेला वकिलांचा संपर्क येथे महत्त्वाचा ठरणार आहे. जिल्ह्यातून बार कौन्सिलचे सदस्य होण्यासाठी वैयक्तिक संपर्क महत्त्वाचा ठरणार असल्याचे जणकारांचे मत आहे.
दृष्टिक्षेपात...
एकूण मतदार १ लाख ४७ हजार
एकूण जिल्हे ३८ (महाराष्ट्र-गोवा)
जिल्ह्यात मतदान २५६५
विजयासाठी साधारण दोन हजार मतदान आवश्यक (जिल्ह्यात)
माघारीचा दिवस २२ फेब्रुवारी.
मतदान २८ मार्च.
महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील साधारण ३८ जिल्ह्यांतील एक लाख ४७ हजार मतदार आहेत. त्यांतून पंचवीस वकिलांची निवड महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या सदस्य पदासाठी होते. पसंती क्रमांकानुसार हे मतदान होते. प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा न्यायालय आणि तालुका न्यायालयात कौन्सिलसाठी मतदान होते. मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात होण्यासाठी कोल्हापूरकरांनी आंदोलनात आघाडी घेतल्यामुळे येथील उमेदवाराला विशेष महत्त्व आहे.
कोकणातील काही जिल्ह्यांतील एकच उमेदवार दिला आहे; मात्र कोल्हापुरातील हा प्रयत्न अयशस्वी ठरल्यामुळे पाच वकिलांनी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करून प्रचार सुरू केला आहे. पसंती क्रमांकाने एका मतदाराला पंचवीस मतदान करता येते.
आजपर्यंत कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन आणि खंडपीठ कृती समितीतून ज्यांनी ज्यांनी काम केले आहे अशा दिग्गजांनी या निवडणुकीत उडी घेतली आहे. खंडपाठीच्या आंदोलनातून साधारण सहा जिल्ह्यांत येथील वकिलांचे चांगले नेटवर्क आहे. त्याचा उपयोग आता कौन्सिलच्या निवडणुकीसाठी होणार आहे.
चर्चेतील उमेदवार
ॲड. शिवाजीराव राणे, ॲड. विवेक घाटगे, ॲड. विनय कदम, ॲड. विल्सन नाथन, ॲड. इंद्रजित कांबळे (जयसिंगपूर), ॲड. शिवराम जोशी, ॲड. जयंत बलुगडे (इचलकरंजी) आदी नावे वकिलांत चर्चेत आहेत. यांतील काहींनी उमेदवारी अर्ज दाखल केले. अन्य काही चर्चेतील उमेदवारांनी ‘नो कमेंटस्’ म्हणून सावध भूमिका घेतली आहे. त्यामुळे काही इच्छुक मतदारांची जुळवाजुळव करूनच १५ फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.