विदर्भ, मराठवाड्यात गारपिटीचा कहर; पिकांचे मोठे नुकसान
पुणे : २०१४ च्या ‘महागारपिटी’ची आठवण डोळ्यांसमोर असतानाच रविवारी विदर्भ, मराठवाड्यासह खानदेशातील अनेक भागांत गारपिटीने दाणादाण उडवून दिली. रब्बी पिके, फळबागांसह मालमत्तेचेही प्रचंड नुकसान या गारपिटीने केले. वाशिम जिल्ह्यात महागाव येथे गारपिटीने यमुनाबाई रामभाऊ हुंबाड या महिलेचा मृत्यू झाला, तर अनेक पशुपक्षी जखमी आणि मृत्युमुखी पडले. मध्य महाराष्ट्र नगर, जळगाव, धुळे मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, विदर्भातील बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशीम, भंडारा जिल्ह्यांतील काही भागांत सकाळी गारांसह जोरदार पाऊस पडला.
पुणे : २०१४ च्या ‘महागारपिटी’ची आठवण डोळ्यांसमोर असतानाच रविवारी विदर्भ, मराठवाड्यासह खानदेशातील अनेक भागांत गारपिटीने दाणादाण उडवून दिली. रब्बी पिके, फळबागांसह मालमत्तेचेही प्रचंड नुकसान या गारपिटीने केले. वाशिम जिल्ह्यात महागाव येथे गारपिटीने यमुनाबाई रामभाऊ हुंबाड या महिलेचा मृत्यू झाला, तर अनेक पशुपक्षी जखमी आणि मृत्युमुखी पडले. मध्य महाराष्ट्र नगर, जळगाव, धुळे मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, विदर्भातील बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशीम, भंडारा जिल्ह्यांतील काही भागांत सकाळी गारांसह जोरदार पाऊस पडला. त्यामुळे मृग बहरात आलेला आंबा, मोसंबी, केळी, संत्रा, द्राक्षे, रब्बी हंगामातील हरभरा, गहू, कांदा मिरची पिकांचे नुकसान झाले आहे. ऐन काढणी हंगामात रब्बी पिकांवर अवकाळी पावसामुळे संक्रात आल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.
दरम्यान, मराठवाड्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. मध्य महाराष्ट्रातील निफाड येथे ११ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे.
वऱ्हाडात दाणादाण
विदर्भाच्या पश्चिम पट्यातील बुलडाणा, अकोला, वाशीमसह अमरावती, भंडारा जिल्ह्यांतील अनेक भागांत गारपिटीसह मुसळधार पावसाने दाणादाण उडवून दिली. बुलडाणा जिल्ह्यातील चिखली, शेगाव, संग्रामपूर, नांदुरा, काळेगाव, मेहकर, अमरावतीतील वरूड, टेंभुरखेडा, वाशीम जिल्ह्यातील महागाव, शिरपूर जैन, रिसोड, मानोरा, मंगळूरपीर आणि भंडारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपिटीसह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे संत्रा, मिरची या पिकांचे मोठे नुकसान झाले. वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यांमध्ये रविवारी गारपीट, वादळी पावसामुळे गहू, हरभरा, संत्रा, केळी, टोमॅटो, बीजोत्पादन प्लॉटचे अतोनात नुकसान झाले. वाशीम जिल्ह्यात गारपिटीच्या तडाख्याने वृद्धेचा मृत्यू झाला, तर बुलडाणा जिल्ह्यातील लाडणापूर भागात तूर काढण्याचे काम करत असलेले शेतमजूर जखमी झाले. आदिवासी क्षेत्रात वादळामुळे घरांवरील टिनपत्रे उडून गेले. चिखली तालुक्यात गारांमुळे गहू, हरभरा पिकांचे नुकसान झाले. भाजीपाला, शेडनेटची ताटातूट होऊन गारांचा खच पडला होता. संग्रामपूर तालुक्यात सातपुड्याला लागून असलेल्या टुनकी, लाडणापूर, संग्रामपूर, वानखेड, वरवट बकाल या भागात गारपीट झाल्याने कांदा, भाजीपाला, संत्रा बागांचे प्रचंड नुकसान झाले. खामगाव, देऊळगावराजा, नांदुरा, मेहकर तालुक्यांमध्ये जोरदार गारपीट झाली. अकोला जिल्ह्यात अकोट, तेल्हारा तालुक्यांत गारपीट झाली. तेल्हारा तालुक्यात दानापूर, हिवरखेड भागात बोराच्या आकारापेक्षा मोठी गार पडली. अकोट तालुक्यात बोर्डी व इतर गावांना वादळी वारा व गारांचा तडाखा बसला. यात केळीच्या बागांचे मोठे नुकसान झाले. इतर भागांतही जोरदार पाऊस झाला. वाशीम जिल्ह्यात मालेगाव, रिसोड, वाशीम या तालुक्यांत ठिकठिकाणी गारपीट झाली. रिसोड तालुक्यातील जोगेश्वरी, महागाव, वाकद, गोहगाव, गोभर्णा, भापूर, वाडीवाकद, गणेशपूर, तपोवन, नेतन्सा, केनवड, कळमगव्हाण, बोरखेडी, मोप, चाकोली, मोरगव्हाणवाडी, भर जहाँगीर, आसोला, मोहनाबंदी, या ठिकाणी गारपीट होऊन गहू, हरभरा या पिकांचे नुकसान झाले. महागाव येथे यमुनाबाई रामभाऊ हुंबाड (वय ७२) या गोपालेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेल्या असता रस्त्यात त्यांना गारा व पावसाचा मार बसला. यात त्यांचा मृत्यू झाला, तर जागेश्वरी येथील ज्ञानेश्वर पिसळ, नारायण वाळूकर, वैभव मोटे यांच्या कुटुंबातील सदस्यांना गारांचा मार बसला.
संत्र्यांचे नुकसान
अमरावती जिल्ह्याच्या संत्रा उत्पादक भागात गारपीट व त्यानंतर झालेल्या पावसाने मृग बहरातील संत्र्यांचे नुकसान झाले. हिरापूर (ता. अंजनगावसुर्जी), बेनोडा, काकडा इतर भागांत गारपीट व जोरदार पाऊस झाला. यवतमाळ, वर्धा जिल्ह्यांतदेखील अवकाळी पावसाने गहू, हरभरा पिकांचे नुकसान झाले.
मराठवाड्यातही दाणादाण
परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांतील अनेक तालुक्यांत मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. जिंतूर (जि. परभणी) तालुक्यातील चारठाणा आणि बामणी मंडलातील अनेक गावांमध्ये गारपीट झाली. जिंतूर तालुक्यात चाराठाणा मंडलातील व बामणी मंडलात बोराच्या आकाराच्या गारा पडल्या. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, नांदेड तालुक्यात पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ, वसमत, सेनगाव तालुक्यातील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. पावसामुळे कापणी केलेले पीक भिजले आहे. गहू, ज्वारी ही पिके आडवी झाली. हरभरा, आंबा मोहोर, संत्रा, टरबूज, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले.
जालना जिल्ह्यात तडाखा
जालना, बीड जिल्ह्यांत गारपीट झाली. गारपिटीने रब्बी पिकांसह फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात काही जण जखमी झाले. जाफराबाद तालुक्यात रविवारी (ता. ११) सकाळी तुफान गारपीट झाली. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या आंबा, डाळिंब, द्राक्ष बागा अक्षरशः भुईसपाट झाल्या असून, कोट्यवधी रुपयांची हानी झाली आहे. मंठा तालुक्यातील पाटोदा, विडोळी, मंगरुळ, गेवराई, मंठा, उंबरखेडा, पांगरी बु., सोनुनकरवाडी, पांगरा ग., किनखेडा, पेवा, किर्तापूर, पेवा, खोरवड, अंभुर शेळके, देवठाणा, मोहदरी आदी गावांत गारांचा पाऊस पडला. शेतीमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. वादळी वारे व गारांचा पाऊस पडल्याने शाळू ज्वारी, गहू, हरभरा आदी काढणीस आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील नळविहिरा, निवडूंगा, टेंभुर्णी, आंबेगाव, गणेशपूर, काळेगावात आदी गावांत अवघ्या ७ मिनिटांत चाललेल्या गारपिटीने होत्याचे नव्हते करून टाकले.
बीड जिल्ह्यात रविवारी गारपिटीचा सर्वाधिक फटका बीड, माजलगाव व गेवराई व शिरूर कासार तालुक्याला बसला. बीड, माजलगाव तालुक्यात ज्वारी, गहू, तसेच तालुक्यातील काही पिकांसह आंबा, डाळिंब आदी फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शिरूर कासार तालुक्यातही काही गावांत गारपीट झाल्याची माहिती सायंकाळपर्यंत होती.
मध्य महाराष्ट्रात शिडकावा
मध्य महाराष्ट्रातील हवामान शनिवारी (ता. १०) दिवसभर ढगाळ होते. रात्री बारानंतर अचानक काही प्रमाणात ढग जमा झाले होते. सकाळी नगरमधील शिर्डी, जळगाव शहर, किनोद, चोपडा, तापी आणि धुळे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारांचा पाऊस पडला. काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. त्यामुळे जळगावमध्ये केळी पिकांचे, गहू, हरभरा या पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले. नाशिक जिल्ह्यात काही भागांत ढगाळ हवामान होते. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांतील काही भागात हवामान अंशत ढगाळ व निरभ्र होते. त्यामुळे थंडीचा पाराही चांगलाच वाढल्याचे चित्र आहे.
मराठवाडा, विदर्भात आज, उद्या पाऊस
आज (ता. १२) विदर्भात बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उद्या (ता. १३) मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. उर्वरित भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. बुधवारपासून (ता. १४) गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुणे परिसरातही हवामान निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. रविवारी (ता. १२) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस) : मुंबई (सांताक्रूझ) १७.८, अलिबाग १८.६, रत्नागिरी १७.३, भीरा १६.०, डहाणू १७.६, पुणे १३.३, जळगाव १२.०, कोल्हापूर १८.१, महाबळेश्वर १५.७, मालेगाव १४.५ , नाशिक १२.३, निफाड ११.०, सांगली १६.१, सातारा १४.०, सोलापूर १८.२, औरंगाबाद १४.६, परभणी (कृषी विद्यापीठ परिसर) १२.५, परभणी शहर १३.९, उस्मानाबाद १३.६, अकोला १७.३, अमरावती १५.४, बुलडाणा १६.४, चंद्रपूर १८.४, गोंदिया १५.०, नागपूर १५.५, वर्धा १७.५, यवतमाळ १९.०.
‘गारपिटीच्या वेळेस आज सकाळी बागेतच होतो. डोळ्यांदेखत होत्याच नव्हतं झालं.’
- संजय मोरे पाटील, नळविहीरा, ता. जाफ्राबाद, जि. जालना.
नुकसान झालेली पिके
कांदा, गहू, हरभरा, टरबूज, टोमॅटो, मिरची, संत्रा, केळी, आंबा, भाजीपाला, शेडनेट व पॉलिहाउस पिके