मुंबई - पाळीव श्वानांच्या परवान्यासाठी आता महापालिकेच्या आरोग्य विभाग कार्यालयात फेऱ्या मारण्याची आवश्यकता नाही. महापालिकेने त्यासाठी ऑनलाइन परवाना पद्धत सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने हा त्रास वाचणार आहे.
मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत पाळीव श्वानांसाठी परवाने देण्यात येतात. पालिकेने प्राण्यांसंदर्भातील विषयांसाठी स्वतंत्र विभाग तयार केला आहे. त्यामध्ये श्वानांसाठी ऑनलाइन परवाने देण्यात येणार आहेत. ही नवीन पद्धत सोपी असल्याने परवाना घेण्याचे प्रमाण वाढेल, असे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
श्वान नोंदणीसाठी 150 रुपये, तसेच वर्षासाठी 100 रुपये असे शुल्क असेल. मुंबईत सध्या 20 ते 25 हजार पाळीव श्वानांचे परवाने घेण्यात आले आहेत. ऑनलाइन पद्धत सुरू झाल्यावर ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.
परवाना देताना श्वानाला रेबीजची लस दिलेली असणे आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र असेल, तरच परवाना देण्यात येणार आहे, असेही पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले.