औरंगाबाद - राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे सिडकोतील हॉटेल रामा इंटरनॅशनलच्या मागे नऊ फेब्रुवारीला "अमित शहा पकोडा सेंटर' सुरू करण्यात आले आहे. रविवारी (ता. 11) विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या सेंटरला भेट देत पकोडे तळून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध केला.
या वेळी मुंडे म्हणाले, 'सत्तेत आल्यावर सहा कोटी जणांना रोजगार देऊ, असे आश्वासन भाजपने दिले होते. प्रत्यक्षात लाखभर बेरोजगारांनाही रोजगार दिला नाही. त्यामुळे हेच बेरोजगार आता सरकारला त्यांची जागा दाखवतील. शहा यांनी बेरोजगार तरुणांचा अवमान केला आहे. या सरकारमध्ये केवळ शहा यांचा मुलगा जय शहा यांनाच रोजगार मिळाला आहे'', असा आरोप त्यांनी केला.
सरकार राणेंची चेष्टा करतेय राज्याचे माजी मुख्यमंत्री असलेले नारायण राणे हे भाजप सोबत गेले. त्याच क्षणाला त्यांना मंत्रिपद दिले गेले पाहिजे होते; मात्र हे मनुवादी सरकार त्यांची चेष्टा करीत त्यांना खड्यासारखे बाजूला करीत आहे, असा टोलाही धनंजय मुंडे यांनी भाजपला लागावला. मुंडे म्हणाले, ""भाजपने राणेंचा स्वाभिमान कितपत ठेवला आहे हे माहीत नाही. आता त्यांचा स्वाभिमानच उरला नाही. यामुळे स्वाभिमान नावाच्या पक्षाने आता कितीही सभा घेतल्या तरी त्यांचा जनमानसावर परिणाम होणार नाही.''