पालीत शिवसेनेतर्फे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा रंगणार
पाली (रायगड) : कबड्डी या अस्सल मातीतील खेळाला सध्या ग्लॅमर प्राप्त झाले आहे. पाली सारख्या छोट्या गावात प्रोलिग कबड्डीप्रमाणे मॅटवरील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांचे आयोजन 24 ते 27 फेब्रुवारीला करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघाला लाखोंची बक्षिसे देण्यात येणार आहेत. या राज्यस्तरीय स्पर्धेकडे सगळ्यांचेच लक्ष लगले असून कबड्डी रसिकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
पाली (रायगड) : कबड्डी या अस्सल मातीतील खेळाला सध्या ग्लॅमर प्राप्त झाले आहे. पाली सारख्या छोट्या गावात प्रोलिग कबड्डीप्रमाणे मॅटवरील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांचे आयोजन 24 ते 27 फेब्रुवारीला करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघाला लाखोंची बक्षिसे देण्यात येणार आहेत. या राज्यस्तरीय स्पर्धेकडे सगळ्यांचेच लक्ष लगले असून कबड्डी रसिकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
शिवसेना रायगड व राजयोगी मित्रमंडळ सुधागड यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या अधिकृत मान्यतेने या स्पर्धा होणार आहेत. अशी माहिती शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई व रत्नागिरी शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी पालीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. येथील जनरल अरुणकुमार वैद्य क्रिडांगणावर पार पडणार्या शिवसेनाप्रमुख चषक 2018 कबड्डी स्पर्धेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्थरावर नाविन्यप्राप्त खेळाडुंचा सहभाग असणार आहे. राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे औचित्य साधून केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांचा नागरी सन्मान सोहळा पार पडणार आहे. लाखोंच्या बक्षिसांच्या या स्पर्धेला शुभेच्छा देण्याकरीता शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यासह पद्मश्री पुरस्कार विजेता हॉकिपट्टू धनराज पिल्ले आदिंसह दिग्गज मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. या स्पर्धेसाठी रत्नागिरी शिवसेना जिल्हाप्रमुख व रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष सचिन कदम हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून तर, राष्ट्रीय कबड्डी पंच भगवान शिंदे व राजयोगी मित्रमंडळाचे अध्यक्ष अविनाश शिंदे हे या स्पर्धांच्या नियोजनाचे काम पाहत आहेत.
पाली येथे होणार्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांसाठी 10 हजार प्रेक्षकांना बसण्यासाठी प्रेक्षक गॅलरी, भव्य प्रकाश योजना, व प्रोलींग प्रमाणे मॅट, थेट माध्यम प्रक्षेपण आदींनी परिपूर्ण असे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, ठाणे, मुंबई उपनगर, व रायगड जिल्ह्यातील नामवंत संघांचा व प्रो कबड्डी स्टार खेळाडुंचा समावेष असणार आहे. या स्पर्धेला शुभेच्छा देण्याकरीता शिवसेना युवासेना प्रमुख, शिवसेना नेते आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार गजानन किर्तीकर, नामदार एकनाथ शिंदे, शिवसेना सचिव डॉ. अनिल देसाई, आदेश बांदेकर, आ. भरत गोगावले, आ. मनोहर भोईर आदिंसह शिवसेना पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पारितोषिक वितरण सोहळ्यास पद्मश्री पुरस्कार विजेते हॉकिपट्टू धनराज पिल्ले, अर्जुन पुरस्कार विजेते अशोक शिंदे, शांताराम जाधव, कबड्डीतील छत्रपती पुरस्कार विजेते राजू भावसार, गणेश शेट्टी, संजय सुर्यवंशी, विजय म्हात्रे, संजय म्हात्रे, सुधीर पाटील, आशिष म्हात्रे, प्रमोद म्हात्रे, आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेतील विजेत्या संघाला प्रथम क्रमांक 1 लाख 11 हजार 11 रुपये, द्वितीय क्रमांक 66 हजार 666 रुपये, तृतीय क्रमांक 33 हजार 333 रुपये, चतुर्थ क्रमांक 22 हजार 222 रुपये आणि आकर्षक चषक देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे. या बरोबरच स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूला बजाज प्लॅटीना बाईक व आकर्षक चषक, उत्कृष्ट चढाई पट्टू एल.ई.डी. टिव्ही, व आकर्षक चषक, उत्कृष्ट पक्कड एल.ई.डी व आकर्षक चषक, प्रतिदिन सर्वोत्कृष्ट खेळाडूला 5555 रुपयाचे पारितोषिक अशी वैयक्तीक बक्षिसे देखिल दिली जाणार आहेत.
महाराष्ट्राची अस्मिता जपणारा कबड्डी खेळ जागतीक पातळीवर लोकप्रिय होत आहे. तांबड्या मातीतील रांगड्या खेळाने आता मॅटवर झेप घेतली आहे. सबंध जगाला आकर्षित करण्याची ताकद कबड्डी खेळात निर्माण झाली आहे. रायगड जिल्हा कबड्डीची पंढरी म्हणून ओळखला जातो. कबड्डीच्या माध्यमातून रोजगार निर्माण होऊन अनेकांचे संसार उभे राहिलेत. ग्रामिण भागातील होतकरु व प्रतिभासंपन्न खेळाडुंना प्रोत्साहन देण्याकरीता या कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे, असे शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई यांनी सांगितले.