काँग्रेस-राष्ट्रवादीला भाजपचा धक्का
कोल्हापूर - स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थायी समितीचे सदस्य अफजल पिरजादे आणि अजिंक्य चव्हाण यांनी पक्षादेश डावलून भाजप-ताराराणी आघाडीचे सभापतिपदाचे उमेदवार आशिष ढवळे यांच्यासाठी हात वर करून उघड मतदान केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार मेघा पाटील यांचा ९ विरुद्ध ७ मतांनी पराभव झाला.
कोल्हापूर - स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थायी समितीचे सदस्य अफजल पिरजादे आणि अजिंक्य चव्हाण यांनी पक्षादेश डावलून भाजप-ताराराणी आघाडीचे सभापतिपदाचे उमेदवार आशिष ढवळे यांच्यासाठी हात वर करून उघड मतदान केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार मेघा पाटील यांचा ९ विरुद्ध ७ मतांनी पराभव झाला.
पिरजादे व चव्हाण यांच्या बंडखोरीमुळे ‘स्थायी’ची सत्ता दोन्ही काँग्रेसच्या ताब्यातून भाजप-ताराराणी आघाडीने खेचून घेतली. या पराभवाने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, परिवहन समिती सभापतिपदी दोन्ही काँग्रेसच्या मदतीने शिवसेनेचे राहुल चव्हाण यांची निवड झाली; तर महिला बालकल्याण समिती सभापतिपदी काँग्रेसच्या सुरेखा शहा यांची निवड झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली.
थंड डोक्याने केले बंड
स्थायी समितीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारी डावलल्याने राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये खदखद होती. ही खदखद दूर करण्याचा प्रयत्न नेत्यांनी केला. सहा महिने पदांचे तुकडे करून प्रत्येकाला संधी देण्याचा प्रयत्न
नेत्यांनी केला; पण अफजल पिरजादे आणि अजिंक्य चव्हाण यांची नाराजी दूर झाली नाही; मात्र त्याचा जरासुद्धा मागमूस दोघांनी लागू दिला नाही. दोघेही दोन्ही काँग्रेससोबतच राहिले. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दोन्ही काँग्रेसचे सदस्य महाबळेश्वर येथे सहलीसाठी गेले होते. या सहलीतही पिरजादे आणि चव्हाण सहभागी झाले होते. आज निवडीदिवशी सर्व सदस्य एकत्रितपणे सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा कार्यालयात एकत्र आले. तेथेही ते उपस्थित होते. सकाळी अकरा वाजता महापालिकेच्या इमारतीतील ताराराणी सभागृहात निवडीच्या सभेला सुरवात झाली, तेथेही श्री. पिरजादे व श्री. चव्हाण हे दोन्ही काँग्रेसच्या सदस्यांसोबत, तसेच गटनेते, पदाधिकाऱ्यांसोबत सभागृहात गेले. तेथेही त्यांनी सस्पेन्स फोडला नाही.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी खासदार धनंजय महाडिक यांनी पक्षाचाच उमेदवार पाडून राष्ट्रवादी काँग्रेसला भेट दिली. आज जे नगरसेवक गुलाल उधळायला होते, ते महाडिक यांच्यासोबत श्री. पवार यांच्या दौऱ्यावेळी होते. त्यामुळे माझ्या या आरोपात तथ्य आहे. भाजप आता महाडिक यांच्या विचाराने चालल्याचे स्पष्ट होत आहे. काहीही करून सत्ता मिळवा या पालकमंत्र्यांच्या आदेशाचे कारभाऱ्यांनी तंतोतंत पालन केले आहे. घोडेबाजार थांबविण्यासाठी आम्ही पक्षीय पातळीवर निवडणुका घेतल्या. महाडिकांना हाताशी धरून फोडाफोडीचे राजकारण कोल्हापूरची जनता कघीही सहन करणार नाही.
-सतेज पाटील, आमदार
पंधरा मिनिटांतच खेळ
सभेचे अध्यक्ष डॉ. कुणाल खेमणार यांनी सभेला सुरवात केली. अर्ज माघारीसाठी पंधरा मिनिटे वेळ दिला. तथापि, राष्ट्रवादीच्या उमेदवार मेघा पाटील आणि भाजपचे उमेदवार आशिष ढवळे हे दोघेही निवडणूक लढविण्यावर ठाम राहिले. प्रत्यक्षात मतदानाला सुरवात झाल्यानंतर मात्र अफजल पिरजादे आणि अजिंक्य चव्हाण या दोघांनीही भाजपचे उमेदवार आशिष ढवळे यांच्या बाजूने हात उंचावून मतदान केल्याने दोन्ही काँग्रेसचे सदस्य अवाक् झाले. दोघांच्या बंडखोरीमुळे दोन्ही काँग्रेसच्या उमेदवार मेघा पाटील यांचा ९ विरुद्ध ७ मतांनी पराभव झाला. यामुळे दोन्ही काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची धावपळ उडाली. पराभव झाल्याने दोन्ही काँग्रेसमध्ये सन्नाटा पसरला. त्यातून कसेबसे सावरत परिवहन समिती आणि महिला बालकल्याण समितीच्या निवडणुकीकडे कार्यकर्त्यांनी लक्ष दिले.
मिरवणुकीची तयारी वाया
१६ सदस्य संख्या असलेल्या स्थायी समितीमध्ये काँग्रेसचे पाच, राष्ट्रवादीचे ३ आणि शिवसेनेचा एक असे ९ बलाबल दोन्ही कॉग्रेसकडे होते. त्यामुळे विजय निश्चित असल्याने मिरवणुकीची तयारीही राष्ट्रवादीच्या उमेदवार मेघा पाटील व त्यांच्या समर्थकांनी केली होती. वाजंत्र्यासह कार्यकर्तेही मिरवणुकीसाठी मोठ्या संख्येने आले होते; पण पराभव झाल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते निराश झाले. याउलट भाजप-ताराराणीने कोणतीही तयारी केली नव्हती. निवडक कार्यकर्ते व नगरसेवकच या सभेसाठी आले होते. स्थायी समितीची सत्ता मिळाल्यामुळे त्यांच्यात उत्साहाचे वातावरण तयार झाले. राष्ट्रवादीने आणलेल्या वाजंत्र्यानाच सुपारी देत वाजतगाजत ढवळे यांची मिरवणूक काढली.
आमदार अमल महाडिक महापालिकेत
भाजप-ताराराणीला सत्ता मिळताच आमदार अमल महाडिक महापलिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे चौकात आले. तासभर ते येथे थांबून होते. आशिष ढवळे यांची सभापतिपदी निवड होताच कार्यकर्त्यांनी अमल महाडिक आणि आशिष ढवळे यांना खांद्यावर घेऊन नाचत जल्लोष केला. भाजप-ताराराणीचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक यावेळी उपस्थित होते.
ढवळे यांना मुख्यमंत्र्यांचा फोन
दोन्ही काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव करून ‘स्थायी’चे सभापतिपद मिळविणाऱ्या आशिष ढवळे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून अभिनंदन केले. मुख्यमंत्री फडणवीस आज इस्लामपूर दौऱ्यावर होते. यावेळी आमदार महाडिक यांनी मुख्यमंत्र्यांना फोन लावून तो ढवळे यांच्याकडे दिला.
कोटी कोटींची उडाणे
स्थायी समिती सभापतिपदाच्या या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नगरसेवक विकले गेल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजेश लाटकर व काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी केला. त्यामुळे या निवडणुकीत कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याची चर्चा आहे. मते मिळविण्यासाठी कोट घातल्याचीही चर्चाही आहे. भाजपने महापालिकेत पुन्हा घोडेबाजार सुरू केल्याचा आरोप दोन्ही काँग्रेसने केला आहे.
घोडेबाजार छेऽ छे! हे तर मतपरिवर्तन
स्थायी समितीच्या या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला उघडपणे मतदान करत राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांनी बंड केले. यामागे आर्थिक उलाढाल, घोडेबाजार आहे का? अशी विचारणा केली असता, ‘‘छेऽ छे! आमचे मतपरिवर्तन झाल्याने आम्ही मतदान केल्याचे त्यांनी सांगितले.’’ आमदार अमल महाडिक यांनीही त्यांचीच ‘री’ ओढत हे मतपरिवर्तन असल्याचे अधोरेखित केले; पण महापालिकेच्या राजकारणात काहीही होऊ शकते, हे आजच्या घटनेमुळे दिसून आले.
महिला बालकल्याण समिती सभापती
महिला व बालकल्याण समिती सभापतिपदासाठी काँग्रेसच्या सुरेखा शहा विरुद्ध भाजप-ताराराणीच्या अर्चना पागर यांच्यात निवडणुक झाली. या निवडणुकीत काँग्रेसच्या सुरेखा शहा यांना पाच मते तर अर्चना पागर यांना चार मते मिळाली. सुरेखा शहा या विजयी झाल्या. उपसभापतिपदी काँग्रेसच्याच छाया पोवार यांना पाच तर भाजप-ताराराणीच्या ललिता बारामते यांना ४ मते मिळाली. छाया पोवार विजयी झाल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपायुक्त मंगेश शिंदे आदी उपस्थित होते.
प्रा. पाटील यांची गैरहजेरी
एरवी महापालिकेच्या कोणत्याही निवडणुकीत सर्व सूत्रे हलविणारे प्रा. जयंत पाटील आज मात्र गैरहजर होते. पत्रकारांनी याबाबत त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विचारताच कोर्ट कामासाठी प्रा. पाटील हे मुंबईला गेले असल्याचे सांगण्यात आले.
अजित राऊत यांच्याकडून निषेध
अजिंक्य चव्हाण यांनी पक्षाविरोधात बंड केल्याने माजी नगरसेवक अजित राऊत यांनी निषेध नोंदविला आहे. राजकारणात विश्वास आणि शब्दाला महत्त्व असते. तेथे तडा जाऊन चालत नाही; पण अजिंक्य चव्हाण यांची ही कृती चुकीची आहे. त्यामुळे आम्ही निषेध नोंदवितो.
जिल्हाध्यक्षांनाच दणका
राष्ट्रवादीच्या सभापतिपदाच्या उमेदवार मेघा पाटील या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या स्नुषा आहेत. पक्षाच्या जिल्हाध्यक्षांच्या सुनेचाच पराभव घरच्या भेदीमुळे झाल्याची भावना पक्षकार्यकर्त्यांत आहे.
हे फक्त कोल्हापुरातच...
आजच्या निवडीनंतर महापालिकेतील स्थिती अशी आहे, महापौर काँग्रेसच्या आहेत, उपमहापौर राष्ट्रवादीचे आहेत, स्थायी सभापतिपद भाजपकडे आहे, परिवहन सभापतिपद शिवसेनेकडे तर विरोधी पक्षनेतेपद ताराराणी आघाडीकडे आहे... हे फक्त कोल्हापुरातच घडू शकते अशी चर्चा आज दिवसभर सोशल मीडियावर रंगली.