आयुष्याचा 'दोर' तुटू नये...
पतंगाच्या चीनी मांजामुळे गंभीर जखमी झालेल्या सुवर्णा मुजुमदार या सकाळच्या तरुण महिला कर्मचाऱ्याची मृत्यूशी तीन दिवस सुरू असलेली झुंज अखेर रविवारी सकाळी संपली. सुवर्णाचं सोन्यासारखं आयुष्य अकस्मात, विचित्रपणे संपलं. आजही भारतीय समाजमनावर नियती, काळ, दैव दुर्देव, विलास अशा परंपरागत संकल्पनेचा दाट पगडा आहे. मात्र, सुवर्णाचा असा मृत्यू केवळ 'नियती'च्या चौकटीत पाहता येत नाही.
पतंगाच्या चीनी मांजामुळे गंभीर जखमी झालेल्या सुवर्णा मुजुमदार या सकाळच्या तरुण महिला कर्मचाऱ्याची मृत्यूशी तीन दिवस सुरू असलेली झुंज अखेर रविवारी सकाळी संपली. सुवर्णाचं सोन्यासारखं आयुष्य अकस्मात, विचित्रपणे संपलं. आजही भारतीय समाजमनावर नियती, काळ, दैव दुर्देव, विलास अशा परंपरागत संकल्पनेचा दाट पगडा आहे. मात्र, सुवर्णाचा असा मृत्यू केवळ 'नियती'च्या चौकटीत पाहता येत नाही. पतंगांच्या खेळात आकाशात उंच उडणारा दुसऱ्याचा पतंग सहजगत्या कापता येण्यासाठी बनविलेला हा धारदार मांजा प्रत्यक्षात अनेकांच्या आयुष्याचा दोरच कापतो आहे. पतंगाच्या या प्राणघातक मांजाचा मुद्दा खरेतर तसा नवीन नाही. दरवर्षी या मांजामुळे पशुपक्षी तसेच माणसे गंभीर जखमी होऊन, त्यापैकी काहीजणांनी मृत्यूलाही कवटाळावे लागत आहे. मांजामुळे जखमी किंवा मृत्युमुखी पडलेल्या पशुपक्ष्यांची फारशी दखलही घेतली जात नाही.
खरंतर, मानवाइतकाच त्यांचाही या पृथ्वीवर हक्क आहे. राष्ट्रीय हरित लवाद तसेच न्यायालयाने बंदी घालूनही या मांजाची विक्री सर्रास सुरू आहे. आकाशात उंचच उंच भरारी घेणारी पतंग जणू तुम्ही तुमच्या आयुष्याची 'पतंग'ही अशीच भिरकावत ठेवण्याचा संदेश देते. संक्रांतीनिमित्त पतंग खेळण्याचा आनंद लुटण्यात खरंतर काहीच गैर नाही. प्रश्न आहे तो आपण हा खेळ सुसंस्कृतपणे, विचारपूर्वक खेळतो का? धारदार चीनी मांजा वापरून पतंग उडविल्याने काटाकाटीचा क्षणिक आनंद मिळेलही. मात्र, तो पशुपक्षी तसेच आपल्याच देशातील बंधूभगिनींच्या जिवावर उठतोय, याचा विचार हा मांजा वापरण्याचा 'गुन्हा' करणाऱ्यांनी आतातरी नक्कीच केला पाहिजे. आज या मांजाने सुवर्णाचा जीवनप्रवास संपवला असला तरी उद्या तो वापरून पतंग उडविणाऱ्या कुणावरही ही वेळ येऊ शकते. पोलिस प्रशासन कायद्याने बंदी असणाऱ्या या मांजाच्या विक्रीवर निर्बंध आणण्यात कमी पडत आहे. यात कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेचा 'अक्षम्य' हलगर्जीपणा आहेच. मात्र, सगळेच कायदा, प्रशासनावर ढकलण्यापेक्षा नागरिक म्हणून आपलीही काही जबाबदारी आहे, हेही व्यवस्थित लक्षात घ्यायला हवे. अन्यथा, कुणाच्याही उमद्या आयुष्याच्या पतंगाची 'कर्तृत्वभरारी' यापुढेही अशीच जमिनीवर येत राहील.
पुणे-मुंबईसारख्या महानगरात सामान्य माणसाचे जीवन दिवसेंदिवस असुरक्षितच होत चालले आहे. अपघात, घातपात, नैसर्गिक व इतर मानवनिर्मित आपत्तीमुळे 'अमूल्य' अशा मानवी आयुष्याचा संकोच होत आहे. मुंबईत लोकलवरील दगडफेकीमुळे अनेकजणांना अंधत्व आले, तर काहीजणांना जीवही गमवावा लागला. प्रचंड लोकसंख्येच्या आपल्या देशात कुणाचा मृत्यू कसा ओढवेल, हे सांगता येत नाही. 'माणूस किती जगला, यापेक्षा तो कसा जगला' याला महत्त्व आहे, असे म्हटले जाते. मात्र, आजच्या काळात त्याचा मृत्यू कसा झाला, हेही महत्त्वाचे मानावे लागेल. जन्ममृत्यूची गाठ अतूटच. आयुष्यातील जबाबदाऱ्या समर्थपणे निभावून वृद्धावस्थेत कृतार्थमनाने इहलोकीचा निरोप घेणे, खरंतर नैसर्गिकच..मात्र, पतंगाच्या मांजासारख्या अत्यंत फालतू कारणामुळेही कुणाचीही इहलोकीची यात्रा अशी संपू नये. पतंगाचा दोर कापण्याच्या नादात आणखी कुणाच्या आयुष्याचा 'दोर' तुटू नये, एवढीच इच्छा. सुवर्णास भावपूर्ण श्रद्धांजली....