लोकसभेसाठी प्रा. मंडलिक हेच शिवसेनेचे उमेदवार - केसरकर
कोल्हापूर - आगामी लोकसभा निवडणुकीत प्रा. संजय मंडलिक शिवसेनेचे उमेदवार असतील, अशी घोषणा शिवसेना नेते व गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात केली.
कोल्हापूर - आगामी लोकसभा निवडणुकीत प्रा. संजय मंडलिक शिवसेनेचे उमेदवार असतील, अशी घोषणा शिवसेना नेते व गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात केली.
कार्यक्रम सव्वापाचला सुरू झाला; पण श्री. केसरकर सातच्या सुमारास व्यासपीठावर आले. त्या वेळी श्री. पवार भाषणाला उभे राहिले होते.
श्री. पवार यांच्या भाषणानंतर श्री. केसरकर यांचे भाषण झाले. पाच-दहा मिनिटांच्या भाषणातच श्री. केसरकर यांनी प्रा. मंडलिक हेच शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार असतील, असे सांगून एकच खळबळ उडवून दिली. प्रत्यक्षात प्रा. मंडलिक यांना ‘राष्ट्रवादी’त घेऊन त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यासाठी आमदार हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांचे प्रयत्न सुरू आहेत. (कै.) मंडलिक यांचे अपुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी परमेश्वराने ताकद द्यावी, असे श्री. मुश्रीफ म्हणाले; तर व्यासपीठावरील सर्वांनी हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे, असे श्री. पाटील म्हणाले.
मात्र, शेवटी बोलायला उठलेल्या श्री. केसरकर यांनी शिवसेनेची उमेदवारी प्रा. मंडलिक यांनाच जाहीर करून सर्वांनाच बुचकळ्यात टाकले. प्रास्ताविक भाषणात प्रा. मंडलिक यांनी (कै.) मंडलिक व श्री. पवार यांच्यातील संबंधाचा ऊहापोह केला. (कै.) मंडलिक यांनी कायमपणे श्री. पवार यांच्या नेतृत्वाखाली काम केले. त्यातून अनेकदा त्यांचा संघर्षही झाला, असे प्रा. मंडलिक या वेळी म्हणाले.
पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष जे. एफ. पाटील यांनी प्रास्ताविक केले. या वेळी व्ही. बी. पाटील, सूर्यकांत पाटील-बुद्धीहाळकर, एम. एस. खापरे, डॉ. भालबा विभुते, दिग्दर्शक यशवंत भालकर, प्राचार्य जीवन साळोखे आदी पुरस्कार निवड समितीचे सदस्य उपस्थित होते.