मुंबई - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या मुंबईतील सर्वच विभागांतील पदाधिकाऱ्यांचे फेरबदल सुरू आहेत. त्यामुळे काही ठिकाणी अंतर्गत धुसफूस सुरू असून, घाटकोपर पश्चिमेकडील शिवसेना शाखा क्रमांक 129च्या शाखाप्रमुखांच्या नियुक्तीच्या वादाचे पर्यवसान रविवारी रात्री दोन गटांतील हाणामारीत झाले.
महापालिका निवडणुकी वेळी भाजपमधून आयत्या वेळी आलेल्या मंगल भानुशाली यांना घाटकोपर पूर्वेकडील प्रभाग क्रमांक 131 मधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेनेतील नाराजांनी त्यांच्या गाड्या फोडल्या होत्या. या घटनेनंतर आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत.
दुसऱ्या पक्षातून वर्षभरापूर्वी शिवसेनेत आलेल्या शिवाजी कदम यांची 129 क्रमांकाच्या शाखा प्रमुखपदी नियुक्ती नुकतीच करण्यात आली आहे. यापूर्वी प्रदीप मांडवकर हे सहा वर्षांपासून विभागाचे शाखाप्रमुख होते. नियुक्तीच्या वादामुळे शिवसेनेचे स्थानिक कार्यकर्ते नाराज होते. यातूनच रविवारी रात्री दोन गटांत शाखेबाहेर हाणामारी झाली.