मामाच्या गावची पोरगी करायची राहूनच गेली: शरद पवार
कोल्हापूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज गोलिवडे (ता. पन्हाळा) येथे आज मामाच्या गावच्या आठवणींना उजाळा दिला. ग्रामस्थांतर्फे त्यांचा ग्रामदैवत भैरवनाथांची दीड किलो चांदीची मूर्ती देवून गौरव झाला.

सत्कारानंतर बोलताना मामाच्या गावची पोरगी करायची राहूनच गेली, अशी मिश्किल टिपणी पवार यांनी केली. पवार कालपासून कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आज सकाळी त्यांनी गोलिवडे गावाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी दिलखुलास संवाद साधला.
पवार यांच्या स्वागतासाठी कोतोली फाट्यापासून स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. गावात तर गुढ्या उभारून आनंदोत्सव साजरा झाला. पवार यांच्या आई शारदाबाई पवार यांचा जन्म या गावातील भोसले कुटुंबामध्ये झाला. भोसले कुटुंबीय काही वर्षांनी कोल्हापूरला वास्तव्यास गेले; परंतु ही आठवण पवार यांना माहिती असल्याने त्यांनी एका जाहिर कार्यक्रमात या गावाला एकदा भेट देणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार या दौऱ्यात त्यांनी ही भेट दिली. गावात सकाळपासूनच पवार यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू होती. गावातील महिलांनी हिरव्या साड्या परिधान केल्या होत्या तर पुरूषांनी कोल्हापुरी फेटे परिधान केले होते. तरूणांनी झांजपथकाच्या निनादात त्यांचे स्वागत केले.
कार्यक्रमास खासदार धनंजय महाडिक, निवेदिता माने, आमदार हसन मुश्रीफ आदी मान्यवर उपस्थित होते.