विराटबरोबरची दोस्ती तुटायची नाय : आफ्रिदी
विराटने माझ्यासाठी नेहमीच आदर दाखवलेला आहे. माझ्या फाउंडेशनसाठी भारतीय संघातील खेळाडूंची स्वाक्षरी असलेली जर्सी कोणताही विचार न करता त्याने मला भेट दिली आहे. विराटबरोबर मी बोलतो तेव्हा नेहमीच त्याच्याकडून आदरयुक्त संवाद साधला जातो. जेव्हा कधी बोलणे होत नसते तेव्हा तो मेसेज करत असतो आणि त्याची आठवण येते तेव्हा मीही असेच करत असतो. त्याचे लग्न झाले तेव्हा मीही त्याचे अभिनंदन केले होते, असे आफ्रिदीने सांगितले.
सेंट मॉर्टिझ (स्वित्झर्लंड) : भारत आणि पाकिस्तान यांचे राजनैतिक संबंध कसेही असले तरी विराट कोहलीबरोबरचे आपले मैत्रीपूर्ण आणि सौहार्दपूर्ण संबंध तुटणार नाहीत, असे जाहीर मत पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीने व्यक्त केले आहे.
"विराट माणूस म्हणून फारच चांगला आहे. जसा मी माझ्या देशाचा सदिच्छा दूत आहे तसा तो त्याच्या देशाचा आहे,' असे आफ्रिदीने "पीटीआय'ला सांगितले. स्वित्झर्लंडमधील बर्फातील क्रिकेट लीग सुरू असून, आफ्रिदी त्यामध्ये एका संघाचे नेतृत्व करत आहे. 50-50 षटकांचा किंवा टी-20 षटकांच्या विश्वकरंडक स्पर्धांमध्ये आफ्रिदी आणि विराट एकमेकांविरुद्ध लढले असले तरी या दोघांमध्ये चांगली मैत्री आहे.
विराटने माझ्यासाठी नेहमीच आदर दाखवलेला आहे. माझ्या फाउंडेशनसाठी भारतीय संघातील खेळाडूंची स्वाक्षरी असलेली जर्सी कोणताही विचार न करता त्याने मला भेट दिली आहे. विराटबरोबर मी बोलतो तेव्हा नेहमीच त्याच्याकडून आदरयुक्त संवाद साधला जातो. जेव्हा कधी बोलणे होत नसते तेव्हा तो मेसेज करत असतो आणि त्याची आठवण येते तेव्हा मीही असेच करत असतो. त्याचे लग्न झाले तेव्हा मीही त्याचे अभिनंदन केले होते, असे आफ्रिदीने सांगितले.
दोन देशांचे संबंध कसे असावेत यासाठी दोन खेळाडू कदाचित त्याचे उदाहरण निर्माण करू शकतात, असेही आफ्रिदी म्हणाला.
आफ्रिदीचा तिरंग्याप्रती आदर
बर्फात होणाऱ्या क्रिकेट लीगचे सामने पाहण्यासाठी भारत-पाकिस्तानसह स्थानिक क्रिकेट चाहते गर्दी करत आहेत. त्यांच्यासाठीही हा वेगळा अनुभव आहे. खेळाडूंबरोबर छायाचित्र काढण्याची स्पर्धा सुरू असते. आफ्रिदी पुढे जात असताना तिरंगा घेतलेल्या युवतींनी आफ्रिदीसह छायाचित्र काढण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी त्यांनी तिरंगा गुंडाळलेला होता. हे आफ्रिदीच्या लक्षात येताच त्याने "फ्लॅग सिधा करो' असे त्यांना सांगितले. त्यांनी तिरंगा नीट धरल्यानंतर आफ्रिदीने त्यांना फोटो काढू दिला.