खोपोली - खोपोली परिसरातील टाटा पॉवर कंपनीच्या सायमाळ येथील वसाहतीत 12 बंगले भागातील सुरक्षा रक्षकांना शनिवारी (ता. 10) रात्री बिबट्याचे दर्शन झाले. टाटा पॉवर व्यवस्थापनाने ही माहिती खालापूर वन विभाग व खोपोली पोलिसांना दिल्यानंतर खोपोलीलगतच्या डोंगर भागातील नागरी वस्ती, वरची खोपोली, सायमाळ व त्यामागील आदिवासी वस्तीतील नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.
खोपोली परिसरात बकरी, कुत्री किंवा इतर पाळीव प्राणी गायब झाले असल्यास वन विभाग, पोलिस, अग्निशामक दल; तसेच अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी असलेल्या सामाजिक संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्राथमिक स्तरावर सावधानता म्हणून जंगलाला लागून असलेल्या वसाहतींत फटाके फोडावेत. पहाटे किंवा सायंकाळी फिरायला जाणाऱ्यांनी खबरदारी घ्यावी. या परिसरात वन विभागाने अतिरिक्त कर्मचारी नियुक्त केले आहेत, अशी माहिती खालापूरचे प्रादेशिक वनाधिकारी (आरएफओ) पाटील यांनी दिली.