प्रमोशन ही चित्रपटाची गरज : मुक्ता बर्वे
"नाटक हे नाट्यगृहात, तर चित्रपट हे चित्रपटगृहातच जाऊन पाहावे लागते. त्या तुलनेत आपण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून वेब पोर्टलवर टाकलेले चित्रपट पाहू शकतो. हल्ली सेन्सॉर टाळण्यासाठी हा पर्याय निवडत असल्याचे पाहायला मिळत आहे. मी स्वतःदेखील वेबपोर्टल पाहणे पसंत करते. यामुळे वेगवेगळ्या भाषांतील चित्रपटाचा आशय, भावना कळतात.''
- प्रिया बापट, अभिनेत्री
पुणे, ता. 10 : उत्तम कलाकृती ही प्रेक्षकांपर्यंत पोचणे महत्त्वाचे असते. कारण चित्रपट हे समाजाचे प्रतिबिंब असतात. ज्या प्रेक्षकांसाठी हा चित्रपट बनविला आहे, त्यांच्यापर्यंत चित्रपट पोचणे महत्त्वाचे असते. कारण हेच चित्रपटाचे खरे यश असते. चित्रपटाचे प्रमोशन केलेच नाही, तर प्रेक्षकांना कसे कळणार की हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यामुळे प्रमोशन ही चित्रपटाची खरी गरज असल्याचे मत अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने व्यक्त केले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित केलेल्या "सांस्कृतिक कट्टा' कार्यक्रमात ती बोलत होती. या वेळी दिग्दर्शिका प्रतिमा जोशी, अभिनेत्री प्रिया बापट, पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेश काळे, सरचिटणीस दिगंबर दराडे आदी उपस्थित होते. मुक्ता बर्वे म्हणाली, ""एकाच दिवशी चार ते पाच मराठी चित्रपट प्रदर्शित होण्याचे कारण म्हणजे हे वेगवेगळ्या कथेचे, विषयांचे असतात. प्रत्येक चित्रपटाचा प्रेक्षक वर्ग वेगळा असतो. एखाद्याला कॉमेडी चित्रपट आवडत असेल, तर त्याचा वेगळा प्रेक्षक वर्ग असेल.''
प्रिया बापट म्हणाली, ""नाटक हे नाट्यगृहात, तर चित्रपट हे चित्रपटगृहातच जाऊन पाहावे लागते. त्या तुलनेत आपण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून वेब पोर्टलवर टाकलेले चित्रपट पाहू शकतो. हल्ली सेन्सॉर टाळण्यासाठी हा पर्याय निवडत असल्याचे पाहायला मिळत आहे. मी स्वतःदेखील वेबपोर्टल पाहणे पसंत करते. यामुळे वेगवेगळ्या भाषांतील चित्रपटाचा आशय, भावना कळतात.''
""आयुष्यातला प्रत्येक क्षण जगता आला पाहिजे. त्या क्षणाचा आनंद लुटता आला पाहिजे. पुढे दहा वर्षांनंतर असे नको वाटायला, की अरे आपली ही गोष्ट करायचीच राहून गेली. त्यामुळे येणारा प्रत्येक क्षण हा बिनधास्तपणे जगा,'' असा सल्लाही प्रियाने दिला.