सर्पमित्र येईपर्यंत सापावर झाकून ठेवला डबा
घरात किंवा परिसरात साप दिसल्यावर नागरिकांनी घाबरून जाऊ नये. सर्पमित्र येईपर्यंत साप पुन्हा बिळात किंवा दुसरीकडे निघून जाऊ नये यासाठी त्यावर डबा ठेवून त्याला झाकून ठेवण्याची कल्पना चांगली आहे. अलीकडे नागरिकांमधून सापांविषयी जागृती दिसून येत आहे.
- पप्पू जमादार, सदस्य, नेचर कॉन्झर्वेशन सर्कल
सोलापूर : इंदिरानगर येथील रहिवासी अशोक निकते यांच्या घरात निघालेला साप बिळात किंवा दुसरीकडे निघून जाऊ नये यासाठी त्यांनी सर्पमित्र येईपर्यंत सापावर प्लास्टिक डबा झाकून ठेवला. निसर्गचक्रात महत्त्वाचा घटक असलेल्या कुकरी जातीच्या बिनविषारी सापाला न मारता घरापासून जवळच असलेल्या झुडपात सोडण्यात आले.
विजयपूर रोड परिसरातील इंदिरानगर पोस्ट ऑफीस शेजारी वास्तव्यास असलेले अशोक निकते यांच्या घराच्या अंगणात साप दिसला. साप बिळात जाऊ नये यासाठी त्यांनी एक प्लास्टिक डबा त्यावर झाकला. सर्पमित्र गोविंद जाधव यांना संपर्क साधण्यात आला. ते परगावी गेल्याने नेचर कॉन्झर्वेशन सर्कलचे सदस्य पप्पू जमादार यांना संपर्क साधण्यात आला. फोनद्वारे माहिती मिळताच आदित्यनगर परिसरात वास्तव्यास असणारे नेचर कॉन्झर्वेशन सर्कलचे सदस्य जयेंद्र भालेराव यांना तेथे पाठविण्यात आले. अवघ्या काही वेळातच भालेराव तेथे पोचले. त्यांनी हळूच सापावर झाकलेला डबा उचलून पाहिले. तो कुकरी जातीचा बिनविषारी साप होता. कुकरी सापाची तेथील रहिवाशांना माहिती सांगून जवळच असलेल्या झुडपात सोडून देण्यात आले.