सुंजवातील चकमक संपुष्टात; 5 जवान हुतात्मा
असा झाला हल्ला
हल्लेखोर दहशतवाद्यांनी सुंजवा लष्करी छावणीत मागील बाजूने घुसखोरी केली. याच भागामध्ये अधिकाऱ्यांची निवासस्थाने आहेत. यानंतर हे दहशतवादी छावणीमध्ये विविध दिशांना पसरले. पोलिस महानिरीक्षक एस. डी. सिंग जामवाल यांच्या मते, साधारणपणे पहाटे 4.55 च्या सुमारास पहारेकऱ्याला संशयास्पद हालचाली आढळून आल्यानंतर त्याने गोळीबार केला. यानंतर दहशतवाद्यांनीही गोळीबार केला.
जम्मू : जम्मूतील सुंजवा लष्करी तळावर शनिवारी पहाटे "जैशे महंमद'च्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात लष्कराचे पाच जवान हुतात्मा झाले, तर अन्य सहा जण जखमी झाले आहेत. आज (रविवार) सकाळी सुमारे 30 तासांनंतर चकमक संपुष्टात आली असून, सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
जखमींमध्ये एक मेजर आणि लष्करी कर्मचाऱ्याच्या मुलीचा समावेश आहे. शनिवार पहाटेपासून सुरू झालेल्या या कारवाईत रात्री उशिरा तीन दहशतवाद्यांना ठार मारण्यात लष्करास यश आले होते. अखेर आज सकाळी सहाही दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर चकमक संपुष्टात आली. शाळेला लक्ष्य करून दहशतवाद्यांकडून हा हल्ला करण्यात आला होता. यापूर्वीही सात वेळेस दहशतवाद्यांनी भारतीय लष्करास लक्ष्य केले होते. उरी येथील लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांनी 2016 मध्ये केलेल्या हल्ल्यात 19 जवान हुतात्मा झाले होते. त्यानंतर हा सर्वांत मोठा हल्ला मानण्यात येत आहे.
सीमेवर पाकिस्तानकडून वारंवार होणारे शस्त्रसंधी उल्लंघन आणि आंदोलनाच्या वणव्यामध्ये सातत्याने होरपळणारे जम्मू-काश्मीर आणखी एका दहशतवादी हल्ल्यामुळे हादरले. या हल्ल्यात लष्करामध्ये "ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर' म्हणून कार्यरत असलेले सुभेदार मदनलाल चौधरी आणि सुभेदार अश्रफ मीर या दोन अधिकाऱ्यांसह पाच जवान हुतात्मा झाले. या हल्ल्यात कर्नल रोहित सोळंकी, मेजर अभिजित, लान्सनायक बहाद्दूरसिंग आणि अन्य दोन जवानांसह लष्करी अधिकाऱ्याची मुलगी यामध्ये जखमी झाली आहे. "जैशे'चा म्होरक्या मौलाना मसूद अझहर आणि सय्यद सलाउद्दीन यांनीच या हल्ल्याचा कट रचला होता. या दोघांच्या संभाषणाची ध्वनिफीत एका हिंदी वृत्तवाहिनीच्या हाती लागली असून, ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या ताब्यातून "जैशे महंमद'चा झेंडाही जप्त करण्यात आला आहे. दहशतवाद्यांचा म्होरक्या अफझल गुरूला 9 फेब्रुवारी 2013 रोजी फाशी देण्यात आली होती. याच दिवशी या फाशीचा बदला घेण्यासाठी "जैशे महंमद'चे दहशतवादी हे लष्कर आणि सुरक्षा संस्थांना लक्ष्य करू शकतात, असा इशारा गुप्तचरांनी आधीच दिला होता.
असा झाला हल्ला
हल्लेखोर दहशतवाद्यांनी सुंजवा लष्करी छावणीत मागील बाजूने घुसखोरी केली. याच भागामध्ये अधिकाऱ्यांची निवासस्थाने आहेत. यानंतर हे दहशतवादी छावणीमध्ये विविध दिशांना पसरले. पोलिस महानिरीक्षक एस. डी. सिंग जामवाल यांच्या मते, साधारणपणे पहाटे 4.55 च्या सुमारास पहारेकऱ्याला संशयास्पद हालचाली आढळून आल्यानंतर त्याने गोळीबार केला. यानंतर दहशतवाद्यांनीही गोळीबार केला.