रिव्हॉल्वरच्या धाकाने अल्पवयीन मुलाचे अपहरण
सांगली - विश्रामबागमधील गव्हर्न्मेंट कॉलनीतील एका अल्पवयीन मुलाचे रिव्हॉल्व्हरच्या धाकाने अपहरण केल्याचा प्रकार महिनाभरानंतर उघडकीस आला आहे. मुलाने स्वत:ची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका करून घेतली होती. मात्र, त्याने भीतीमुळे तक्रार दिलेली नव्हती. या प्रकरणी गुंड राकेश कदम याच्यासह तिघांवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राक्या मुंडक ऊर्फ राकेश मधुकर कदम (वय २८, रा. हनुमाननगर), सनी विजयकुमार सहाणी (२०, रा. मंगळवार बाजार, विश्रामबाग) आणि प्रसाद पाटील यांनी २५ डिसेंबर २०१७ ला सायंकाळी सातला धामणी नाक्याजवळून एका अल्पवयीन मुलाचे रिव्हॉल्वरचा धाक दाखवून अपहरण केले होते. धामणी रोडवर हा मुलगा वाहनावरून जात असताना तिघांनी त्याला अडविले आणि तू आमच्या विरोधकांबरोबर का फिरतोस, असे विचारत तुला आता जिवंत सोडत नाही, असे म्हणून त्याचे अपहरण केले. त्यानंतर त्याला कवठेमहांकाळ येथे नेले. तेथे दुसऱ्या दिवशी तिघेही झोपल्याचे पाहून त्या अल्पवयीन मुलाने स्वतःची सुटका करून घेतली.
मुलाने स्वत:ची सुटका केली, तरी राकेश कदमच्या भीतीमुळे त्याने तक्रार दिली नव्हती. दोन दिवसांपूर्वी राकेश आणि सनी सहाणी यांना श्रीनाथ पंडित याच्या अपहरणप्रकरणी अटक करण्यात आली. त्यानंतर मुलाने काल (ता. ९) रात्री विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.