सांगली जिल्ह्यात शंभरहून अधिक गावचे रस्ते अंधारात बुडाले
सांगली - जिल्ह्यातील मिरज, तासगाव, वाळवा, खानापूर, शिराळा तालुक्यातील अनेक गावातील विज थकबाकीपोटी महावितरणने पथदिव्यांचे कनेक्शन तोडले आहे. त्यामुळे शेकडो गावातील प्रमुख रस्ते अंधारात बुडाले आहेत.
सांगली - जिल्ह्यातील मिरज, तासगाव, वाळवा, खानापूर, शिराळा तालुक्यातील अनेक गावातील विज थकबाकीपोटी महावितरणने पथदिव्यांचे कनेक्शन तोडले आहे. त्यामुळे शेकडो गावातील प्रमुख रस्ते अंधारात बुडाले आहेत. शासनस्तरावर ग्रामविकास विभागाकडून वीज बिल भरले जात असतानाही महावितरणने कनेक्शन तोडण्याची मोहीम उघडली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींकडून जिल्हा परिषदेकडे तक्रारी येत आहेत.
ग्रामपंचायत हद्दीतील पथदिव्यांचे वीज बिल भरण्यासाठी शासनस्तरावर ग्रामविकास विभागाकडून बजेटमध्येच तरतूद केली जाते. ग्रामविकास विभागाकडून वीज बिलाची रक्कम महावितरणकडे परस्पर दिली जाते. परंतू वीज बिलाची थकबाकी कोट्यवधी रूपयांच्या घरात गेली आहे. त्यामुळे महावितरणने ग्रामपंचायतींना कोणतीही सूचना न देता एकापाठोपाठ एक ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांचे कनेक्शन तोडण्याची मोहीम उघडली आहे. मिरज पूर्व भागातील गावांच्या पथदिव्यांचे कनेक्शन चार दिवसापूर्वीच तोडली गेली आहेत. पाठोपाठ तासगाव, वाळवा, खानापूर, शिराळा आदी तालुक्यातील अनेक गावातील पथदिव्यांचे कनेक्शन तोडण्यात आली आहेत. त्यामुळे शेकडो गावातील प्रमुख रस्ते अंधारात बुडाले आहेत.
महावितरणने नोटीस न देता वीज कनेक्शन तोडल्यामुळे गाव पातळीवरून संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. वीज बिल भरण्याची जबाबदारी ग्रामविकास विभागाची आहे. तसेच सदरचे पैसे बुडण्याची शक्यताही नाही. तरी देखील महावितरणने कनेक्शन तोडली आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीकडून जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडे तक्रारी येत आहेत. सद्यस्थितीत शंभरहून अधिक गावचे अंधारात आहेत. त्यामुळे तेथे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच चोऱ्यांची भितीही व्यक्त केली जात आहे.
नोटीस न देता कारवाई-
उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ म्हणाले, ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांचे वीज बिल शासनस्तरावरून ग्रामविकास विभागाकडून भरले जाते. तरीही महावितरणने नोटीस न देता वीज कनेक्शन्स तोडली आहेत. तत्काळ वीज पुरवठा सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.