'गुड मॉर्निंग' पथकामुळे लोटा बहाद्दरांची पळापळ !
अनेक गावातील ग्रामस्थ हागणदारीमुक्त गाव योजनेला प्रतिसाद देत नाहीत. शौचालये असूनही काहीजण त्याचा वापर करीत नाहीत. अशा लोकांविरुद्ध संगमनेर तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरु करण्यात आली आहे. याकामी 'गुड मॉर्निंग' पथक स्थापन करण्यात आले आहे.
तळेगाव दिघे (नगर) : संगमनेर पंचायत समितीच्या 'गुड मॉर्निंग' पथकाने तळेगाव दिघे व निमोण येथे शनिवारी भल्या पहाटे गावकूस गाठले. या पथकाच्या कारवाईमुळे उघड्यावर शौचास बसणाऱ्या लोटा बहाद्दरांची चांगलीच पळापळ झाली. यात काही प्रतिष्ठीतही सापडले. सुमारे ६० लोटा बहाद्दरांना या पथकाने पकडले.
अनेक गावातील ग्रामस्थ हागणदारीमुक्त गाव योजनेला प्रतिसाद देत नाहीत. शौचालये असूनही काहीजण त्याचा वापर करीत नाहीत. अशा लोकांविरुद्ध संगमनेर तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरु करण्यात आली आहे. याकामी 'गुड मॉर्निंग' पथक स्थापन करण्यात आले आहे.
सदर पथकातील विस्तार अधिकारी सदानंद डोखे, बबन वाघमोडे, सहायक फौजदार अशोक जांभूळकर, ग्रामविकास अधिकारी शरद वावीकर, नंदराम पवार, सुनील नामरे, ग्रामसेवक राजेंद्र मुंजाळ, सुरेश मंडलिक, स्वच्छता कक्ष प्रमुख राजू सरोदे, चालक विलास वाळूंज यांच्या पथकाने भल्या सकाळीच ६० लोटा बहाद्दरांना पकडले. यावेळी काहींनी पळ काढला, मात्र त्यांना कॅमेऱ्यात कैद करण्यात आले आहे. सदर व्यक्तींविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे विस्तार अधिकारी सदानंद डोखे यांनी सांगितले. या कारवाईने लोटा बहाद्दरांचे धाबे दणाणले आहे.