बदलीच्या आदेशाला केराची टोपली ; येरवडा मनोरुग्णालयातील प्रकार
येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयातील तत्कालीन अधीक्षक डॉ. भालचंद्र डोंगळीकर हे 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाल्याने डॉ. बहाले यांच्याकडे अधीक्षकपदाचा तात्पुरता पदभार सोपविण्यात आला आहे. शासनाकडून लवकरच कायमस्वरूपी अधीक्षकांची नेमणूक झाल्यानंतर बहाले यांच्याकडील अतिरिक्त पदभार काढला जाईल. तसेच, त्यांच्या बदलीबाबत आस्थापना विभागाकडून माहिती घेतली जाईल.
- डॉ. साधना तायडे, अतिरिक्त संचालक, आरोग्य विभाग
येरवडा : सरकारी धोरणाप्रमाणे सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची तीन वर्षांत बदली होते. याला कोणीच अपवाद नसतात. मात्र, येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात मनोविकारतज्ज्ञ डॉ. मधुमिता बहाले गेल्या वीस वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसल्या आहेत. एवढेच नसून आरोग्य विभागाने त्यांच्याकडे प्रभारी अधीक्षक पदाची अतिरिक्त जबाबदारी दिली आहे. त्यामुळे सरकारच्या धोरणालाच हरताळ फासल्याची चर्चा आरोग्य विभागात रंगली आहे.
येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात गेल्या अठरा-वीस वर्षांपासून डॉ. मधुमिता बहाले मनोविकारतज्ज्ञ पदावर कार्यरत आहेत. त्या अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी काम करीत असल्यामुळे राज्य सरकारने डॉ. बहाले यांची 31 मे 2015 रोजी ठाणे मनोरुग्णालयात बदली केली होती. त्यापाठोपाठ 7 सप्टेंबर 2015 रोजी रुग्णालयाचे तत्कालीन अधीक्षक डॉ. विलास भैलुमे यांची रत्नागिरी प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या ठिकाणी बदलीचे आदेश काढले होते. संबंधित अधिकाऱ्यांनी बदलीच्या ठिकाणी तत्काळ रुजू झाल्याचा अहवाल आरोग्य संचालकांना सादर करण्याचे आदेशात नमूद केले आहे.
मात्र, गेल्या तीन वर्षांत डॉ. बहाले बदलीच्या ठिकाणी हजर झालेले नाहीत. याउलट तत्कालीन अधीक्षक डॉ. भालचंद्र डोंगळीकर 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर आरोग्य विभागाने डॉ. बहाले यांच्याकडे प्रभारी अधीक्षकाची जबाबदारी टाकली आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश देणे आणि दुसरीकडे रिक्त झालेल्या अधीक्षक पदावर नियुक्ती करणे, या निर्णयामुळे आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी गोंधळून गेले आहेत.