...तर सेना नेत्यांचीही जयंती तिथीनुसारच: नितेश राणे
मराठा संघटनांचा गराडा
सभेच्या पूर्वतयारीसाठी शुक्रवारी (ता. 9) सकाळपासून आमदार नितेश राणे शहरात आलेले आहेत. त्यांनी मराठा समाजाच्या विविध प्रश्नांवर लढा उभारलेला आहे. तसेच राज्यातील विविध जिल्ह्यात झालेल्या मराठा आरक्षणासंबंधी कार्यक्रमांमध्ये त्यांनी आक्रमक भूमिका मांडलेली आहे.
औरंगाबाद : जगभरात तमाम शिवभक्त 19 फेब्रुवारीला तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करतात. मात्र, शिवसेनेनी तिथीचा घोळ घालून वेगळी जयंती साजरी करण्याच्या घाट घातलेला आहे. हा अवमान यापुढे आम्ही सहन करणार नाहीत. त्यांनी तत्काळ यावर पडदा टाकत दुसरी जयंती बंद करावी, अन्यथा शिवसेना नेत्यांच्याही वर्षभरातच तिथीनुसारच जयंती साजरी करू, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.
येत्या 19 फेब्रुवारीला तारखेनुसार शिवजयंती साजरी केली जाते. मात्र, शिवसेना तिथीनुसार साजरी करते. याविषयावरून आता सोशलमिडीयावर जोरदार चर्चा रंगते आहे. या मुद्यावर आमदार राणे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. रविवारी (ता. 11) महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांची शहरात सभा होत आहे. या सभेच्या तयारीसाठी शुक्रवारी (ता. 9) आमदार नितेश राणे शहरात दाखल झाले आहेत. शिवजयंतीच्या मुद्यावर त्यांची भूमिका जाणून घेतली असता, ते म्हणाले, शिवसेनेनी ही नाटके बंद करावीत, अन्यथा येत्या वर्षभरात शिवसेनेच्या नेत्यांची जयंती तिथीनुसार साजरी करू, असा इशारा दिला. तसेच पुणे येथे शिवभक्तांनी राम गणेश गडकरी यांचा पुतळा तोडल्यानंतर याप्रकरणी संबंधितांना तातडीने अटक केली. मात्र, कोरेगाव - भिमा प्रकरणास जबाबदार असलेल्या मनोहर भिडे, मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हे दाखल होवूनही अटक का होत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
सिडकोतील रामलिला मैदानावर सायंकाळी रविवारी पाच वाजता नारायण राणे यांची सभा होत आहे. शिवसेनेचे आक्रमक नेते म्हणून पुढे आलेले श्री. राणे काही वर्षापूर्वी आपल्या सोबतच्या आमदारांसह कॉंग्रेसमध्ये दाखल झाले. मात्र, मागील वर्षी पक्षापासून फारकत घेत त्यांनी आता स्वत:च्या पक्षाची स्थापना केली. यानंतर त्यांची शहरात प्रथमच सभा होत आहे. त्यांच्या सभेबद्दल लोकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. या सभेत ते काय बोलतात, याकडे राज्यातील राजकीय मंडळींचे लक्ष लागले आहे.
मराठा संघटनांचा गराडा
सभेच्या पूर्वतयारीसाठी शुक्रवारी (ता. 9) सकाळपासून आमदार नितेश राणे शहरात आलेले आहेत. त्यांनी मराठा समाजाच्या विविध प्रश्नांवर लढा उभारलेला आहे. तसेच राज्यातील विविध जिल्ह्यात झालेल्या मराठा आरक्षणासंबंधी कार्यक्रमांमध्ये त्यांनी आक्रमक भूमिका मांडलेली आहे. त्यामुळे मराठा संघटनांसोबत त्यांच्यासोबत असल्याचे शुक्रवारी (ता. 9) बघायला मिळाले. दिवसभर विविध मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांचा त्यांच्या आजूबाजूला गराडाच दिसून आला. शिवाय, विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनीही त्यांची भेट घेतली. यावेळी सोबत या, तुम्हाला ताकद देऊ, असे आवाहन त्यांनी केले.