प्राणी-पर्यटन (उज्ज्वला बर्वे)
प्राणिप्रेमातून व्यवसाय उभा करता येतो. त्या व्यवसायात कुत्र्याला फिरवून आणण्यापासून प्राणी-पाळणाघर चालवणं आणि प्राणी-समुपदेशक म्हणून काम करण्यापर्यंत बरंच काही येतं; पण प्राणिप्रेम आणि पर्यटनप्रेम हे दोन्ही अंगी असेल, तर विविध देशांत किंवा शहरांत तिथल्या स्थानिक लोकांच्या घरांत काही दिवस राहता येतं आणि यजमानांच्या प्राण्यांची काळजी घेता घेता तो परिसर आणि त्याची संस्कृती छान निवांतपणे अनुभवता येतं. ‘पेटसिटिंग’ हे या नव्या ट्रेंडचं नाव. या अनोख्या क्षेत्राविषयी आणि तो करणाऱ्या एका कलंदर दाम्पत्याविषयी माहिती.
प्राणिप्रेमातून व्यवसाय उभा करता येतो. त्या व्यवसायात कुत्र्याला फिरवून आणण्यापासून प्राणी-पाळणाघर चालवणं आणि प्राणी-समुपदेशक म्हणून काम करण्यापर्यंत बरंच काही येतं; पण प्राणिप्रेम आणि पर्यटनप्रेम हे दोन्ही अंगी असेल, तर विविध देशांत किंवा शहरांत तिथल्या स्थानिक लोकांच्या घरांत काही दिवस राहता येतं आणि यजमानांच्या प्राण्यांची काळजी घेता घेता तो परिसर आणि त्याची संस्कृती छान निवांतपणे अनुभवता येतं. ‘पेटसिटिंग’ हे या नव्या ट्रेंडचं नाव. या अनोख्या क्षेत्राविषयी आणि तो करणाऱ्या एका कलंदर दाम्पत्याविषयी माहिती.
प्रा णिप्रेमातून व्यवसाय उभा करता येतो, हे अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतं. भारतात, पुण्यातसुद्धा तसे व्यवसाय आता स्थिरावले आहेत. त्या व्यवसायांत कुत्र्याला फिरवून आणण्यापासून प्राणी-पाळणाघर चालवणं आणि प्राणी-समुपदेशक म्हणून काम करण्यापर्यत बरंच काही येतं; पण प्राणिप्रेम आणि पर्यटनप्रेम हे दोन्ही अंगी असेल, तर विविध देशांत, किंवा शहरांत तिथल्या स्थानिक लोकांच्या घरांत काही दिवस राहता येतं आणि यजमानांच्या प्राण्यांची काळजी घेताघेता तो परिसर आणि त्याची संस्कृती छान निवांतपणे अनुभवता येतं. पुण्यात आमच्याकडे आलेल्या आमच्या एका मित्रदम्पतीमुळे नुकतंच मला हे कळलं.
एकमेकांच्या पाळीव प्राण्यांची वेळप्रसंगी काळजी घेणाऱ्या तरुण, कल्पक मित्रमंडळींनी २०१०मध्ये ‘ट्रस्टेड हाऊससिटर्स’ नावाचं संकेतस्थळ सुरू केलं. कारण प्राणी पाळणं हे खूप जबाबदारीचं काम असतं, हे त्यांना माहीत होतं. बाहेरगावी जाताना सगळीकडेच त्यांना नेणं शक्य नसतं; पण त्यांची सोय लावताना प्राणी-पालकांची विविध प्रकारे अडचण होते. पैसे तर खूप खर्च होतातच; पण दुसऱ्या ठिकाणी आपल्या पाल्याकडे नीट लक्ष दिलं जाईल की नाही, त्यांना कसला संसर्ग तर होणार नाही ना, ‘पाल्यां’ना अशा अनुभवांचा ताण तर येणार नाही ना, अशा अनेक शंका पालकांना भेडसावतात. त्यापेक्षा ‘पाल्याला घरीच ठेवता आलं तर किती छान,’ असं सगळ्यांच्या मनात यायचं. बेबीसिटिंगसाठी कसे बेबीसिटर घरी बोलवता येतात, तसे ‘पेटसिटर’ घरी येऊन राहिले तर? त्याच विचारांतून ‘ट्रस्टेड हाऊससिटर’ हे संकेतस्थळ सुरू झालं. आता जगभर त्याचा विस्तार झाला आहे.
अर्थात हे काम पैशांसाठी न करता ज्यांना हाऊससिटिंग किंवा पेटसिटिंगच्या निमित्तानं नवनव्या ठिकाणांना भेट देण्याची आवड आहे, जे कोणत्याही प्राण्यांना सहज आपलंसं करू शकतात अशांनीच ते करणं अपेक्षित आहे. ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड अशा देशांमधून अशा सिटर्सना पुष्कळ मागणी आहे. लंडन, न्यूयॉर्क, सिडनी, कॅनबेरा, पर्थ अशा शहरांमध्ये खूप पेटसिटर्स उपलब्ध आहेत असं या संकेतस्थळावर म्हटलं आहे. मात्र, याच ठिकाणांपुरता या उपक्रमाचा विस्तार मर्यादित नाही. इतर अनेक देशांत त्याचं जाळं विस्तारलं आहे. भारतात फक्त गोव्यातल्या काही संधी या संकेतस्थळावर मला दिसल्या आहेत.
माझी मैत्रीण तित्सियाना आणि तिचा जोडीदार मिशेल कॅनडातल्या माँट्रियल इथले आहेत. त्यांना प्रवासाची प्रचंड आवड. त्यातही प्रवास म्हणजे केवळ गाजलेल्या पर्यटनस्थळांचं दर्शन नव्हे, तर एखाद्या ठिकाणी निवांत काही दिवस राहणं, स्थानिक लोकांत मिसळणं, सायकली, स्कूटर घेऊन मनाला येईल तसं फिरणं, स्थानिकच खाद्यपदार्थ खाणं असा त्यांचा शिरस्ता असतो. त्यात त्यांना कुत्र्या-मांजरांची खूप आवड आहे. त्यांच्यासाठी ‘ट्रस्टेड हाऊससिटर्स’ हे वरदानच ठरलं. मिशेलचा पन्नासावा वाढदिवस झाल्यावर त्यांनी आता पुढची काही वर्षं आपण फक्त फिरायचं असं ठरवलं, आणि ‘ट्रस्टेड हाऊससिटर्स’वर ‘सिटर’ म्हणून नाव नोंदवलं. हाऊससिटिंगच्या कामात कधीकधी खरंच घराची- म्हणजे बाग, झाडं, हिरवळ- यांची निगा राखणंसुद्धा येऊ शकतं. किंवा फक्त कुत्री-मांजरी नव्हेत, तर घोडे, गाढवं, शेळ्या, मेंढया अशा कोणत्याही प्राण्यासाठी मागणी येऊ शकते, असं त्यांनी वाचलं होतं. त्यामुळे तर त्यांना अधिकच उत्सुकता वाटत होती.
२०१५ च्या डिसेंबरमध्ये त्यांना पहिलं काम मिळालं. इटलीमध्ये. तित्सियाना मूळची इटलीची असल्यानं स्वतःच्या खर्चानं इटलीला जाणं त्यांना नेहमीचंच होतं; पण सिटिंगसाठी जे घर मिळालं, तसं आलिशान आणि निसर्गरम्य परिसरातलं घर तोवर कधी तिनं इटलीत प्रत्यक्ष पाहिलंही नव्हतं, मग त्यात राहणं तर दूरच. यांच्या ताब्यात घर आणि कुत्री देऊन जाताना घराच्या मालकिणीनं त्यांना सगळं सविस्तर समजावून सांगितलं. कुत्र्यांच्या सवयी, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांच्या डॉक्टरांचा तपशील, बागेत काय काय लावलं आहे, घरात कुठं काय आहे, ते काय वापरू शकतात इत्यादी इत्यादी. कुत्र्यांसाठी अचानक काही पैसे लागले तर असावेत म्हणून जाताना तिनं तेही थोडे देऊन ठेवले.
तित्सियाना-मिशेलनं पंधरा दिवस तिथं मस्त घालवले. कुत्र्यांच्या ठराविक वेळा पाळून मग ते स्वतंत्रपणे हिंडायला जायचे. सगळं घर त्यांनी चकाचक ठेवलं. मालकीण परत यायच्या दिवशी तिच्यासाठी सगळा स्वयंपाक तयार होता. एकूणच ती त्यांच्यावर इतकी खूश झाली, की तित्सियाना-मिशेलच्या या पहिल्याच कामाचा तिनं त्यांना ‘पाच तारे’ देऊन गौरव केला. संकेतस्थळावर हे मूल्यमापन इतरांना सहज दिसू शकतं.
त्यानंतरच्या दोनच वर्षांत त्या दोघांनी आणखी दहा ठिकाणी हाऊससिटिंग आणि पेटसिटिंग केलं. तेही अमेरिका, मोरोक्को, पोर्तुगाल, सिंगापूर, थायलंड, मलेशिया अशा विविध देशांत. प्रत्येक यजमानानं त्यांना पंचतारांकित दर्जा बहाल केला. त्यामुळे आता पुढच्या महिन्यात ते थायलंडमधल्या ज्या कामासाठी जाणार आहेत, त्यासाठी ५१ अर्ज आले असूनही यजमानानं यांचीच निवड केली आहे. त्यामुळे आता ते भारतातून श्रीलंका, मग व्हिएतनाम करून थायलंडला जातील. तिथून हाँगकाँग आणि शांघायला भेट देऊन मग परत जातील कॅनडाला. अशा सगळ्या प्रवासात ते शक्यतोवर ‘एअर बीएनबी’ या अलीकडे लोकप्रिय झालेल्या व्यवस्थेचाच लाभ घेतात. कारण त्यामुळे लोकांच्या घरात राहायला मिळतं. स्थानिक लोकांच्या ओळखी होतात. खरीखुरी संस्कृती पाहायला मिळते.
हाऊससिटर म्हणून काम करताना सिटरना ओळखणाऱ्या काहींचा संदर्भ तर द्यावा लागतोच; पण यजमानानं मागितला, तर आपल्या भागातल्या पोलिस ठाण्यातून चारित्र्याचा दाखलादेखील द्यावा लागतो. आतापर्यंत तरी या दोघांकडे असा दाखला कुणी मागितलेला नाही. यांनाही कोणत्याही यजमानांचा वाईट अनुभव आलेला नाही. कारण संकेतस्थळ त्या बाबतीत बरीच खबरदारी घेतं. त्यासाठी ते यजमानांकडून आणि हाऊससिटरकडून वार्षिक वर्गणीदेखील घेतात.
म्हणजे संकेतस्थळाची वर्गणी भरायची, शिवाय कामासाठी कोणताही मोबदला तर मिळत नाहीच, उलट आपणच आपल्या खर्चानं यजमानांच्या ठिकाणी पोचायचं आणि तरीही इतके लोक इतक्या आवडीनं हे काम करतात यावर विश्वास ठेवणं अनेकांना कठीण वाटतं. अर्थात सगळेच हाऊससिटर काही काही अशा लांबलांबच्या देशांत जातात असं नाही, काही आपल्याच देशात किंवा जवळपासदेखील जातात; पण अशी कामं करताना त्यांना वेगळ्या ठिकाणी विनामूल्य राहता येतं, घरच्या घरी स्वयंपाक करता येत असल्यानं एरवीपेक्षा खाण्यावर खर्च कमी होतो, नवीन मित्र- दोन पायांचे आणि चार पायांचे- जोडता येतात हा त्यांना मोठा फायदा वाटतो.
शेवटी फायदा तोटा आपण मानण्यावरच असतो, नाही का?