सात शिलेदारांनी घातली प्रतापगडाला प्रदक्षिणा
महाबळेश्वर - महाराष्ट्रातील सात शिलेदारांनी प्रतापगडाला प्रदक्षिणा घालण्याचा संकल्प केला. कड्या-कपारी अन् घनदाट जंगलातून मार्ग काढत दहा तासांत या शिलेदारांनी ही मोहीम फत्ते केली.
महाबळेश्वर - महाराष्ट्रातील सात शिलेदारांनी प्रतापगडाला प्रदक्षिणा घालण्याचा संकल्प केला. कड्या-कपारी अन् घनदाट जंगलातून मार्ग काढत दहा तासांत या शिलेदारांनी ही मोहीम फत्ते केली.
शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देत सह्याद्रीच्या डोंगररांगेत उभा असणारा प्रतापगड साडेतीन हजार फूट उंच आहे. कर्तव्य प्रतिष्ठान व पोलादपूरच्या शिवमुद्रा प्रतिष्ठानने या गडाच्या प्रदक्षिणेची मोहीम आखली. अतिशय खडतरपणे, कड्याकपारीतून साहस, धाडस, जिद्द आणि धेयाच्या जोरावर सात शिलेदारांनी ही मोहीम फत्ते केली. प्रतापगड हा चोहोबाजूंनी असणाऱ्या उत्तुंग कड्यामुळे अभेद्य आहे. या किल्ल्याला प्रदक्षिणा घालण्याचे आव्हान सात शिलेदारांनी स्वीकारले. त्यांना प्रतागडावरील युवा गिर्यारोहक अजित जाधव यांनी मदत केली. या मोहिमेचे उपक्रम प्रमुख सचिन मेहता, इतिहास अभ्यासक अजय धनावडे, प्रशांत भूतकर, ‘शिवमुद्रा’चे अध्यक्ष प्रकाश कदम व विठोबा रेणोसे होते. अंदाजे २१ किलोमीटरची प्रदक्षिणा नवीन वाट काढत दहा तासांत पूर्ण केली गेली. मोहिमेची सुरवात गड पूजन करून पहिल्या पायरीपासून सुरू झाली. शिवकाळात प्रमुख घाटमार्ग असणाऱ्या किनेश्वर वाटेने दाट जंगलातून चिरेखिंडीकडे मार्गक्रमण सुरू झाले. या प्रवासात डोंगराच्या धारेवरून चिपेची वाट येथे प्राचीन कातळात कोरलेल्या पायऱ्या, किनेश्वर प्राचीन घाट मार्गाचे दर्शन झाले. घाट वाटेवरील पाणवठे आजही अस्तित्वात असल्याचे दिसून आले. त्यानंतर ही मोहीम प्रतापगडाच्या दक्षिण कड्याकडे सरकली.
दक्षिण बुरुज, कडेलोट सोडून चिरेखिंडच्या वरच्या बाजूस सर्व जण पोचले. आता खडतर कडा चढून रेडका बुरुजाजवळ पोचायचे आव्हान शिलेदारांसमोर उभे होते. शिलेदार सुतार पेढ्याजवळ येऊन पोचले. तेथूनच वर डोंगराच्या धारेने (राक्कीची वाट) वर निघायचे होते. सुतार पेढ्याच्या वस्तीतील लोकांनी शिलेदारांना मार्ग दाखवला. सर्व अडथळे पार पाडत शिलेदार रेडका बुरुजाखाली पोचले. सर्वजण एकत्र गडाच्या तटबंदीच्या खालून साखळी पद्धतीने चालत यशवंत बुरुजापासून शिवप्रताप बुरुजावर (ध्वज बुरुज) पोचले. शिवरायांना मानवंदना देऊन ही मोहीम फत्ते झाली.
मोहिमेतील सहभागी शिलेदार...
या मोहिमेत उपक्रम प्रमुख सचिन मेहता, ॲड. प्रशांत भूतकर, प्रकाश कदम (शिवमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष), प्राचार्य डॉ. अंजय धनावडे, विठोबा रेणोसे (गुरुजी), अजित जाधव, राघू रेणोसे ऊर्फ शेलारमामा (वाटाडे) यांनी यशस्वी भाग घेतला. प्रतागडावरील युवा गिर्यारोहक अजित जाधव यांनी त्यांना मदत केली.