क्लिक करा.. एडिट करा! (गौरव दिवेकर)
मोबाईलवर काढलेला एकही फोटो चांगला आला नाही, तरीही ‘मेकअप’ करायला ढीगभर ॲप्स आपल्या मदतीसाठी सदैव तत्पर असतात. आपल्या फोटोंचं, व्हिडिओंचं रूप खुलवायला मदत करणाऱ्या अशाच ॲप्सविषयी माहिती.
मोबाईलवर काढलेला एकही फोटो चांगला आला नाही, तरीही ‘मेकअप’ करायला ढीगभर ॲप्स आपल्या मदतीसाठी सदैव तत्पर असतात. आपल्या फोटोंचं, व्हिडिओंचं रूप खुलवायला मदत करणाऱ्या अशाच ॲप्सविषयी माहिती.
कोणे एके काळी फोटो काढणं हा दुर्मिळ क्षण असायचा. मात्र, आता सगळ्यांच्या हातात मोबाईल आल्यानंतर फोटो काढणं ही ‘कला’ सगळ्यांनाच साध्य झाली आहे. आपल्यापैकी बहुतांश लोक फोटो दणादण क्लिक करत सुटतात. पन्नास फोटो क्लिक केल्यावर त्यातला एखादा चांगला येतोच!... पण एकही फोटो चांगला आला नाही, तरीही ‘मेकअप’ करायला ढीगभर ॲप्स आपल्या मदतीसाठी सदैव तत्पर आहेत... कारण सोशल मीडियामध्ये ‘क्लिक’ व्हायचं असेल, तर तुमच्या ’क्लिक’ला चांगलं रूपडं देण्याची गरज कधी ना कधी भासू शकतेच!
व्हीएससीओ कॅम
गेल्या काही वर्षांपासून ‘व्हीएससीओ कॅम’ हे मोबाईल ॲप फोटो आणि व्हिडिओ एडिट करण्यासाठी युजरप्रिय आहे. या ॲपमध्ये इतर बहुतांश ॲपसारखे एडिटिंगचे भरपूर पर्याय उपलब्ध आहेत; पण फिल्टर्स हे याचं वैशिष्ट्य. यात डिफॉल्ट येणारे फिल्टर्स भन्नाटच आहेत; शिवाय काही ॲड-ऑन फिल्टर्स विकत घेण्याची सोयही यात आहे. बाकी डिफॉल्ट फिल्टर्सच वापरायचे असतील, तर हे ॲप फुकट आहे. हे ॲप ४९ एमबीचं आहे.
‘गूगल प्ले-स्टोअर’वर सर्च करा : VSCO
ॲप रेटिंग : ४.४
स्नॅपसीड
हे ‘गूगल’चं ॲप आहे. फोटोमध्ये साध्या स्वरूपाचे बदल किंवा एडिटिंग करण्यासाठी हे ॲप उपयुक्त आहे. फोटो शार्प करण्यासाठीचे ‘स्नॅपसीड’मधली टूल्स इतर ॲप्सपेक्षा अधिक चांगली आहेत. शिवाय फोटोमधल्या एखादा विशिष्ट भागातला ब्राइटनेस, कॉन्ट्रास्ट आणि सॅच्युरेशन बदलण्यासाठी यात ‘सिलेक्टिव्ह ॲडजस्ट’ हे टूलही आहे. ‘गूगल’चं मोबाईल ॲप्लिकेशन असल्यामुळं त्यांनी ‘या ॲपमधील विविध सुविधा कशा वापराल,’ असं सपोर्ट पेजच सुरू केलं आहे. हे ॲप २४ एमबीचं आहे.
‘गूगल प्ले-स्टोअर’वर सर्च करा : Snapseed
ॲप रेटिंग : ४.५
फिल्मोरा-गो
मोबाईलवर पटकन काढलेल्या व्हिडिओमध्ये अनेकदा किरकोळ एडिटिंगची गरज भासत असते. यासाठी फिल्मोरा-गो हे सर्वोत्तम ॲप आहे. डेस्कटॉपवरून किंवा एकदम व्यावसायिक पद्धतीच्या एडिटिंगमध्ये मिळणाऱ्या बहुतांश सुविधा या मोबाईल ॲपमध्ये मोफत उपलब्ध आहेत. केवळ व्हिडिओच नव्हे, तर फोटोंचा स्लाईड-शो करणं, त्याला संगीताची जोड देणं हेदेखील आपल्या मोबाईलवर शक्य होतं. व्हिडिओतला एखादा भाग कापणं, व्हिडिओ रोटेट करणं, दोन किंवा त्याहून अधिक व्हिडिओ क्लिप्स एकत्र करणं हे ‘फिल्मोरा गो’मध्ये शक्य आहे. व्हिडिओवर काही मजकूर लिहिण्याची सुविधाही यात आहे. हे ॲप ३४ एमबीचं आहे.
‘गूगल प्ले-स्टोअर’वर सर्च करा : FilmoraGo
ॲप रेटिंग : ४.३
वी-व्हिडिओ
या ॲपमध्ये व्हिडिओ तयार करणं, एडिट करणं आणि पब्लिश करणं या सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. आपल्या व्हिडिओला एखादं गाणं जोडायचं असेल, तर तेदेखील याद्वारे शक्य आहे. इथून आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरही व्हिडिओ प्रसिद्ध करता येऊ शकतो. यात एकच थोडा किचकट भाग आहे. एडिट करण्यापूर्वी ते व्हिडिओ ‘वी-व्हिडिओ’च्या सर्व्हरवर आधी अपलोड करावे लागतात. मग एडिटिंग पूर्ण झालं, की पुन्हा डाऊनलोड करून घ्यावा लागतो. हे ॲप १८ एमबीचं आहे.
‘गूगल प्ले स्टोअर’वर सर्च करा : WeVideo
ॲप रेटिंग : ४.१