"आधार'विना महिलेची रुग्णालयाबाहेर प्रसूती ; डॉक्टर व परिचारिका निलंबित
गुरुग्राम (हरियाणा) : आधार कार्डाशिवाय प्रसूती कक्षात प्रवेश नाकारल्याने जिल्हा रुग्णालयाच्या अपत्कालीन विभागाच्या बाहेर गर्भवतीने बाळाला जन्म दिला. ही घटना गुरुग्राममध्ये शनिवारी घडली. या घटनेनंतर एका डॉक्टरला आणि परिचारिकेला निलंबित करण्यात आले असल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. के. राजोरा सांगितले.
गुरुग्राम (हरियाणा) : आधार कार्डाशिवाय प्रसूती कक्षात प्रवेश नाकारल्याने जिल्हा रुग्णालयाच्या अपत्कालीन विभागाच्या बाहेर गर्भवतीने बाळाला जन्म दिला. ही घटना गुरुग्राममध्ये शनिवारी घडली. या घटनेनंतर एका डॉक्टरला आणि परिचारिकेला निलंबित करण्यात आले असल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. के. राजोरा सांगितले.
मुन्नी केवट (वय 25) या गर्भवतीला आज सकाळी कळा सुरू झाल्याने पती व इतरांनी रुग्णालयात दाखल केले. ""आम्ही सकाळी नऊला रुग्णालयात पोचलो. बाह्य रुग्ण विभागातून आम्हाला प्रसूती कक्षात जाण्यास सांगण्यात आले. तेथे दाखल करून घेण्यासाठी कर्मचाऱ्याने पत्नीच्या आधार कार्डाची मागणी केली,'' असे मुन्नीचा पती अरुण केवट याने सांगितले. आधार कार्ड आणले नसल्याने त्याचा क्रमांक देण्याची तयारी दाखविली होती व नंतर कार्डाची प्रत देऊ, अशी विनंती केली असता आधार कार्डशिवाय पत्नीला प्रसूती कक्षात प्रवेश देण्यास तेथील डॉक्टर व परिचारिकेने नकार दिला, असा दावा अरुणने केला.
पत्नीजवळ नातेवाइकांना थांबवून अरुण आधार कार्डची प्रत आणण्यास बाहेर गेला. त्यांनी मुन्नीला बाह्य रुग्ण विभागात आणले; मात्र तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांना बाहेर हाकलले. मुन्नीच्या प्रसूती कळा वाढत होत्या. त्यातच तिने आपत्कालीन विभागाच्या बाहेर बाळाला जन्म दिला, अशी माहिती तिचा नाकेवाईक रामसिंहने दिली.
घटनेचे चित्रीकरण
या संपूर्ण घटनेचे चित्रण अन्य रुग्ण करत होते; पण तरीही रुग्णालयाचा कर्मचारीवर्ग मुन्नीच्या मदतीला धावला नाही. मुन्नीची प्रसूती झाल्यानंतर फरशीवर रक्त सांडले होते. त्यानंतर तिची मदत कर्मचाऱ्यांनी केली, असा दावा नातेवाइकांनी केला. या दिव्यातून मुन्नी पार पडल्यानंतर तिच्या कुटुंबाने रुग्णालयात मिळालेल्या अमानुष वागणुकीचा निषेध नोंदवत संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. यावरून एक डॉक्टर व परिचारिकेला निलंबित करण्यात आले असून, यात कोणाचा सहभाग होता का? याची अंतर्गत चौकशी करण्यात येत असल्याचे डॉ. राजोरा यांनी सांगितले.