जम्मू-काश्मीर विधानसभेत 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा
''या घोषणा देण्यामागे माझा वैयक्तिक निर्णय होता. मी या घोषणा दिल्याने इतर कोणालाही याबाबत आक्षेप नसावा''.
- अकबर लोन, आमदार, नॅशनल कॉन्फरन्स
जम्मू : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघनही केले जात आहे. त्यानंतर आता जम्मू-काश्मीर विधानसभेतच 'पाकिस्तान जिंदाबाद' घोषणा देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
शनिवारी विधिमंडळ सभागृहाचे कामकाज सुरु असताना भाजपच्या आमदारांनी सभागृहात पाकिस्तानविरोधी घोषणा दिल्या होत्या. या घोषणेनंतर नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार अकबर लोन यांनी विधानसभेतच 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा दिल्या. त्यानंतर माध्यमांसमोर लोन यांनी आपण 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा दिल्याचे कबुल केले. ''या घोषणा देण्यामागे माझा वैयक्तिक निर्णय होता. मी या घोषणा दिल्याने इतर कोणालाही याबाबत आक्षेप नसावा'', असे लोन यांनी सांगितले.
''आमदार लोन यांचे वक्तव्य कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. नॅशनल कॉन्फरन्सला दोन राष्ट्रांचा सिद्धांत मान्य नाही, याचे भान त्यांनी ठेवावे. त्यांच्या या वक्तव्याबाबत मी पक्षाचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांच्याशी चर्चा केली आहे. लोन यांच्या वक्तव्याचे पक्षातील कोणीही समर्थन करत नाही'', असे नॅशनल कॉन्फरन्सचे प्रवक्ते जुनैद अझिम मट्ट यांनी सांगितले.
दरम्यान, लोन यांच्या या वादग्रस्त घोषणेमुळे नवा वादंग निर्माण होण्याची शक्यता असून, पक्षाकडून त्यांच्यावर काय कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.