पवईत अवघ्या 10 रुपयांसाठी मित्राकडून मित्राची हत्या
पवईतील मित्राने त्याच्याच मित्राची अवघ्या 10 रुपयांसाठी हत्या केल्याची खळबळजनक घटना 7 फेब्रुवारीला घडली. याप्रकरणी पवई पोलिसांनी जीवन मोरेला (35) अटक केली आहे.
मुंबई : पवईतील मित्राने त्याच्याच मित्राची अवघ्या 10 रुपयांसाठी हत्या केल्याची खळबळजनक घटना 7 फेब्रुवारीला घडली. याप्रकरणी पवई पोलिसांनी जीवन मोरेला (35) अटक केली आहे.
पवईतील गौतम नगरमधील जीवन मोरे यांची त्याच परिसरातील दिनेश जोशी यांच्याशी घनिष्ठ मैत्री होती. दोघे कायम एकत्र असायचे. 7 फेब्रुवारीला ते दोघेही दुपारी ठरल्याप्रमाणे भेटले. या वेळी दोघांनी पवईतील साई बांगुर्डा गावात पार्टीची योजना आखली. त्यानुसार, दिनेशने चिकनदेखील आणले होते. पार्टी सुरू करण्यापूर्वी दिनेश याने जीवनकडून त्यांचे राहिलेले 10 रुपये मागितले. त्याचा जीवनला राग आला. त्याने दिनेशला उचलून फेकले. त्यानंतर बांबूने बेदम मारहाण करून तो तिथून निघून गेला.
येथे दिनेश जखमी अवस्थेत पडल्याची माहिती त्याच्या आईला समजली. आईने त्याला घरी नेले; मात्र दिनेश हालचाल करीत नसल्याचे पाहून आईने त्याला डॉक्टरकडे नेले; मात्र उपचारापूर्वीच दिनेशचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मारहाणीमुळेच दिनेशचा मृत्यू झाल्याच्या शवविच्छेदन अहवालामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करत जीवनला अटक केली.