अज्ञात वाहनाच्या धडकेने जेजुरीजवळ तरुणाचा मृत्यू
जेजुरी-मोरगाव रस्त्यावर खोमणेवस्तीजवळ शुक्रवारी (ता. 9) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. जालिंदर बापूराव नाझीरकर (वय 32, रा. नाझरे कडेपठार, ता. पुरंदर) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
जेजुरी : जेजुरी-मोरगाव रस्त्यावर खोमणेवस्तीजवळ शुक्रवारी (ता. 9) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. जालिंदर बापूराव नाझीरकर (वय 32, रा. नाझरे कडेपठार, ता. पुरंदर) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत अनिल दामोदर नाझीरकर यांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेला जालिंदर नाझीरकर हा नाझरे कडेपठार येथील रहिवासी असून, तो दररोज आपल्या दुचाकीवरून सकाळी जेजुरीत व तेथून बसने पुण्याला कामाला जात असे. सायंकाळी पुन्हा जेजुरीतून दुचाकीवरून आपल्या घराकडे जात असे. शुक्रवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घराकडे जाताना खोमणेवस्तीजवळ त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसली. यामध्ये त्याच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. परिसरातील रहिवासी राजू पानसरे, विजय खोमणे व इतर कार्यकर्त्यांनी त्यास आपल्या वाहनातून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. जेजुरी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास हवालदार चंद्रकांत सातभाई करीत आहेत.
दरम्यान, या अपघातातील अज्ञात वाहनाबाबत कोणाला काही माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जेजुरी-मोरगाव रस्ता हा जेजुरी शहराजवळ अरुंद आहे. जेजुरी परिसरात या रस्त्यावर सतत छोटे-मोठे अपघात होत असतात.