प्रत्यक्षाहुन खूपच सुंदर कल्पित प्रतिमा (हेमंत जोशी)
या जगात प्रत्येक गोष्ट निसर्गतःच घडली आहे किंवा ती निसर्गाचाच भाग आहे, असं आपण मानतो. निसर्गातल्या अनेक मूलद्रव्यांना मानवाच्या बुद्धीचा परीसस्पर्श झाला, त्यातून आपल्या गरजांनुसार आणि उपयुक्ततांनुसार अनेक वस्तू घडत गेल्या. उदाहरणार्थ ः कडेकपारीत, जंगलात राहत असताना पिण्याच्या पाण्यासाठी मानवानं झाडांचे खोळ, करवंट्या, दगडाचा खोलगट भाग आदी वापरून आपली ‘भांड्या’ची गरज भागवली असेल. तेव्हापासून पाहिलं तर हळूहळू आकार, रंग आणि सौंदर्यदृष्टीनं त्यात अनेक बदल घडत गेले.
या जगात प्रत्येक गोष्ट निसर्गतःच घडली आहे किंवा ती निसर्गाचाच भाग आहे, असं आपण मानतो. निसर्गातल्या अनेक मूलद्रव्यांना मानवाच्या बुद्धीचा परीसस्पर्श झाला, त्यातून आपल्या गरजांनुसार आणि उपयुक्ततांनुसार अनेक वस्तू घडत गेल्या. उदाहरणार्थ ः कडेकपारीत, जंगलात राहत असताना पिण्याच्या पाण्यासाठी मानवानं झाडांचे खोळ, करवंट्या, दगडाचा खोलगट भाग आदी वापरून आपली ‘भांड्या’ची गरज भागवली असेल. तेव्हापासून पाहिलं तर हळूहळू आकार, रंग आणि सौंदर्यदृष्टीनं त्यात अनेक बदल घडत गेले. आज एखाद्या क्रॉकरी-शॉपमध्ये आपण गेलो तर तिथं वेगवेगळ्या डिझाइनची, वेगवेगळ्या धातूंची, रंगांची, आकारांची पिण्याच्या पाण्याची भांडी पाहायला मिळतील.
एखादी गृहिणीसुद्धा अशी भांडी खरेदी करताना किचनच्या डेकोरला किंवा आल्या-गेल्या पाहुण्यांना देताना काय चांगलं दिसेल याचा विचार नक्कीच करते. आज ‘प्रॉडक्ट डिझायनिंग’ हे पूर्णतः स्वतंत्र असं क्षेत्र निर्माण झालेलं आहे. तिथं वस्तूची गरज, तंत्र आणि सौंदर्य यांचाच प्रामुख्यानं विचार केला जातो. वस्त्रोद्योगात तर ‘शरीर झाकणं’ या उद्देशापलीकडं जाऊन फॅशनला (कसे दिसणार याला) जास्त महत्त्व दिल जातं. वस्तूच्या गरजपूर्तीबरोबरच ‘सौंदर्य’ ही बाब कळीची ठरते. सौंदर्यदृष्टीमुळं वस्तूला रूप, रंग, आकार यांचा साज चढला. अगदी रोजच्या व्यवहारातल्या कप, टेबल, आरसा, चारचाकी गाड्या... अशा अनेक वस्तूंना एक विशिष्ट दृश्यरूप प्राप्त झालं. हळूहळू आकार, रंग, पोत आदींनुसार दृश्यरूपातली त्या त्या वस्तूची खास ओळख किंवा प्रतिमा आपल्या मनात घट्ट होत गेली. काही वेळा वस्तूंच्या समूहातून, तशाच किंवा दोन भिन्न आकारांच्या वस्तूंच्या एकत्रीकरणामुळं, तुटण्या-फुटण्यामुळं त्या वस्तूच्या प्रतिमा रूढार्थापेक्षा वेगळ्या भासतात...
कधी तुटलेल्या कंगव्यात मानवी चेहरा... कधी मोडक्या छत्रीत ‘दिसणारं’ टांगलेलं वटवाघूळ... कधी आकाशात ढगांच्या पुंजक्यात टक्कर देण्यासाठी सरसावलेला हत्ती...(मेघदूत) कधी समुद्रकाठच्या वाळूत लाटांमुळं उमटलेले उडणारे पक्षी... कधी गॅरेजच्या सुट्या भागांमध्ये ‘हेड ऑफ द बुल’... (पिकासो) ...कधी काय तर कधी काय!
असे अनेक क्षण अनेकदा प्रत्येकाच्याच आयुष्यात आले असतील आणि त्या त्या वेळी त्या त्या रूपात अनेक आकारांचं दर्शन प्रत्येकाला झालं असेल. कलाकार, चित्रकार हे अनुभव बुद्धीच्या कसोटीवर पडताळून पाहू लागतो. कलेच्या चौकटीत बसवू लागतो आणि त्या वस्तूच्या पल्याडचं रूपदर्शन, निरनिराळ्या प्रतिमांचे दृश्यभास त्याच्या चित्रावकाशात घडू लागतात. एका प्रतिमेतून अनेक प्रतिमा...अनेक प्रतिमांतून एक प्रतिमा...असे पट उलगडत जातात.
***
आम्ही काही मंडळी कोल्हापूरकडं जात असताना मध्ये साताऱ्याच्या आसपास ड्रायव्हरला आणि आम्हाला काही क्षण विसावा हवा म्हणून चहा-न्याहारीच्या ढाब्याजवळ गाडी थांबवली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लांबवर शेतं पसरलेली होती. कुठं ऊस, तर कुठं काळीभोर मोकळी शेतजमीन दिसत होती. समोरच्या शेतात बायामाणसं काम करत होती. शेताच्या कडेला दोन झाडं होती. रंगीबेरंगी कापडांचे तुकडे जोडून केलेली झोळी - एक टोक या झाडाच्या खोडाला आणि दुसरं टोक त्या झाडाच्या खोडाला- अशा पद्धतीनं बांधलेली दिसली. मी थोडं जवळ जाऊन पाहिलं. आतलं बाळ पाय वर करून खेळत होतं. एक छोटी मुलगी गाणं म्हणत त्या झोळण्याची दोरी ओढून झोके देत होती. दारावर लावतात तशी कापडी महिरप त्या झोळीला खालच्या बाजूला शिवलेली होती. ते दृश्य टिपण्यासाठी मी कॅमेरा डोळ्याला लावला. मला चक्क त्या व्ह्यू-फाईंडरमधून ती प्रतिमा रंगीबेरंगी कंगव्यासारखी भासली. ती प्रतिमा कॅमेऱ्यात न टिपता मी ती माझ्या पेंटिंगमध्ये उतरवली. काळ्याभोर शेताच्या पार्श्वभूमीवर महिरपीची गोधडी...आणि त्या गोधडीवर ठेवलं त्या खऱ्या झोळीतलं पाय वर करून खेळणारं बाळ. खरं तर शेतात नवऱ्याबरोबर काबाडकष्ट करणारी ती खेड्यातली बाई. आपल्या बाळाच्या झोळीसाठी मिळेल त्या कापडाचे तुकडे जोडून तिनं गोधडीची झोळी केली असावी. कुठंतरी मिळालेली फाटकी महिरप ते छान दिसावं या दृष्टीनं तिनं त्या झोळीला जोडली असावी. कुठंतरी सौंदर्य जपण्याचा तिनं केलेला प्रयत्न पाहून मला आश्चर्य...मुळीच वाटलं नाही! कारण, प्रत्येकाला सौंदर्यदृष्टी ही असतेच, असं माझं ठाम मत आहे.
या प्रतिमा कुठंतरी मनावर कोरल्या जातात आणि कधीतरी कॅनव्हासवर उतरतात. त्या बाईच्या-आईच्या त्या सौंदर्यदृष्टीला एक चित्रकार म्हणून मी केलेलं हे दंडवत समजा!