राहुल यांच्या प्रचाराचा झंझावात आजपासून
कर्नाटकात "आघाडीकारण' नको
दावणगिरी : कॉंग्रेस संसदीय समितीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी भाजपला शह देण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहन केले आहे. सोनियांचे हे आघाडीचे राजकारण राष्ट्रीय पातळीवर लागू होते, कर्नाटकमध्ये नाही. बहुजन समाज पक्ष आणि धर्मनिरपेक्ष जनता दल यांच्या आघाडीचा कॉंग्रेसवर काहीही परिणाम होणार नाही, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी म्हटले आहे.
कलबुर्गी : विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रचाराचा झंझावात आज (ता. 10) पासून उत्तर कर्नाटकमधून सुरू होणार आहे.
हैदराबाद- कर्नाटक भागातून राहुल यांची तीन दिवसीय प्रचार यात्रा सुरू होणार (10 ते 13 फेब्रुवारी) असून ते बळ्ळारी, रायचूर, गुलबर्गा आणि कोप्पल जिल्ह्यांना भेटी देणार आहेत. विविध सामाजिक समीकरणांची जुळवाजुळव करण्यासाठी ते अनेक मंदिरे आणि धार्मिक संस्थांनादेखील भेटी देतील.
दलित आदिवासींबरोबरच अन्य मागासवर्गीयांची मतेही कॉंग्रेसबरोबरच असल्याचे पक्षाच्या रणनीतिकारांचे म्हणणे आहे. आता हैदराबाद- कर्नाटक भागातील अल्पसंख्याकांची मते मिळवण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न असेल, तसेच या भागातील भाजपची पारंपरिक मतपेढी असणाऱ्या लिंगायत समाजाची मनधरणी करण्याचे प्रयत्न राहुल गांधी करणार आहेत. हुलीगम्मा मंदिर, गावी सिद्धेश्वर मठ, अनुभव मंडप आणि ख्वाजा बंदे नवाज यांच्या दर्ग्यालाही राहुल भेट देणार आहेत. याशिवाय ते राज्य सरकारच्या विविध योजनांचे लाभार्थी ठरलेले व्यापारी, शेतकरी आणि अन्य श्रमजीवी घटकांशी संवाद साधणार आहेत.
याआधीच्या निवडणुकीत
याआधी 2013 च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने हैदराबाद- कर्नाटक भागातील 40 पैकी 24 जागा जिंकल्या होत्या, हेच प्रमाण 2008 मध्ये केवळ 14 एवढे होते. कॉंग्रेसचे हे मोठे यश मानले जाते. कॉंग्रेसने या भागातील 50 टक्के जागा जिंकल्या असल्या तरीसुद्धा मतांचे प्रमाण काही वेगळेच सांगते. भाजप 2013 मध्ये तीन वेगवेगळ्या पक्षांमध्ये विभागला गेला होता. भाजप, केजीपी आणि बीएसआर कॉंग्रेस या तीन पक्षांच्या एकत्रित मतांचे प्रमाण हे 2008 मध्ये भाजपला मिळालेल्या मतांपेक्षा अधिक होते. भाजप या निवडणुकीत पराभूत झाला असला तरीसुद्धा या पक्षाला मिळालेली मते लक्षणीय होती. कॉंग्रेसचे अनेक नेते या निवडणुकीत काठावर विजयी झाले होते.
राजकीय आघाडीवर
लिंगायत, एससी- एसटींवर कॉंग्रेसचे लक्ष
उच्चवर्णीयांसाठी सौम्य हिंदुत्वाचा स्वीकार
कॉंग्रेस नेत्यांची धार्मिक संस्थांशी चर्चा
"हैदराबाद- कर्नाटक'ला दिलेल्या
विशेष दर्जाचे कॉंग्रेसकडून भांडवल
कर्नाटकात "आघाडीकारण' नको
दावणगिरी : कॉंग्रेस संसदीय समितीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी भाजपला शह देण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहन केले आहे. सोनियांचे हे आघाडीचे राजकारण राष्ट्रीय पातळीवर लागू होते, कर्नाटकमध्ये नाही. बहुजन समाज पक्ष आणि धर्मनिरपेक्ष जनता दल यांच्या आघाडीचा कॉंग्रेसवर काहीही परिणाम होणार नाही, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी म्हटले आहे.