दहा रुपयांच्या नाण्याने केले कोटीचे एटीएम मशीन बंद
सावंतवाडी - पैसे भरण्याच्या मशीनमध्ये दहा रुपये अडकल्यामुळे एक कोटी रुपयाचे मशीन गेले तीन महिने बंद आहे. हा प्रकार येथील स्टेट बॅंक शाखेच्या एटीएम केंद्रात घडला आहे
सावंतवाडी - पैसे भरण्याच्या मशीनमध्ये दहा रुपये अडकल्यामुळे एक कोटी रुपयाचे मशीन गेले तीन महिने बंद आहे. हा प्रकार येथील स्टेट बॅंक शाखेच्या एटीएम केंद्रात घडला आहे. याबाबत बॅंकेच्या प्रशासनाकडून दुजोरा देण्यात आला आहे; मात्र ते मशीन सुरू करणे शक्य नसल्याची चर्चा आहे.
शहराच्या मध्यभागी असलेल्या स्टेट बॅंकेची वाढती उलाढाल लक्षात घेता त्याठिकाणी तब्बल एक कोटी रुपये खर्चून वर्षभरापूर्वी पैसे भरणा करण्याचे मशीन बसविण्यात आले होते; मात्र काही महिन्यापूर्वी अज्ञात ग्राहकाकडून पैसे भरताना त्यात नोटासोबत दहा रुपयाचे कॉईन घालण्यात आल्याने ते मशीन बंद पडले.
अनेक ग्राहक स्टेट बॅंकेच्या माध्यमातून आपले आर्थिक व्यवहार करतात. शासकीय निवृत्त झालेल्या अनेक ग्राहकांची खाती याच बॅंकेत असतात. त्यामुळे लोकांना चांगली सेवा मिळण्यासाठी बॅंकेच्या प्रशासनाने योग्य ती पावले उचलणे गरजेचे आहे. त्यासाठी ग्राहकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी योग्य तो निर्णय घ्यावा.’’
- अभय पंडित,
ग्राहक तथा व्यावसायिक
परिणामी सद्य:स्थिती लक्षात घेता हे मशीन पूर्णतः बंद आहे. त्यामुळे ग्राहकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. दुसरीकडे बॅंकेत कर्मचाऱ्यांची संख्या कमी आणि उलाढाल जास्त असल्यामुळे कर्मचाऱ्यांनासुद्धा त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे लोकांच्या फायद्यासाठी ही यंत्रणा पूर्ववत सुरू करण्यात यावी, अशी मागणी ग्राहक आणि कर्मचाऱ्यांकडून होत आहे.
याबाबत बॅंकेच्या कॅश ऑफिसर सुधीर साळगावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रक्रियेला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, ‘‘हा प्रकार खरा आहे. एका अज्ञात ग्राहकाकडून मशीनमध्ये दहा रुपयाचे कॉईन घालण्यात आले होते. ते अडकल्यामुळे हा प्रकार घडला. ज्या कंपनीचे मशीन आहे, त्याचे टेक्निशियन आले होते; मात्र तो कॉईन बेल्टमध्ये अडकल्याने मशीन सुरू होत नाही. परिणामी कंपनीकडून ती दुसरी बदलून घेण्याबाबत चर्चा सुरू आहे; मात्र त्या मशीनमध्ये कोणी कॉईन घातला ती व्यक्ती मिळाली नाही.’’
मुख्य व्यवस्थापक अनभिज्ञ...
याबाबत बॅंकेचे मुख्य व्यवस्थापक विलास धुरपकर याच्यांशी संपर्क साधला असता त्यांना मशीन बंद आहे ते माहितीच नाही असे सांगितले. ते म्हणाले, ‘‘वरचेवर मशीन बंद होत असते. ते कंपनीच्या माणसांना बोलावून सुरू करण्यात येते. चार दिवसांपूर्वी सुरू होते. आता बंद झाले काय ते माहिती नाही.’’