आंध्रला विशेष दर्जा देण्यासाठी काँग्रेसचा पाठिंबा : राहुल गांधी
आंध्र प्रदेशातील जनतेकडून राज्याला विशेष दर्जा देण्याबाबत मागणी केली जात आहे. याशिवाय येथील पोलावरम प्रकल्पाच्या मागणीसाठी काँग्रेसचा पाठिंबा असेल. त्यामुळे हे करण्यासाठी आता सर्व पक्षांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे. या सर्वासाठी आणि न्यायासाठी आपला पाठिंबा हवा.
- राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष
नवी दिल्ली : आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यासाठी काँग्रेसचा पाठिंबा असेल. यासाठी विविध राजकीय पक्षांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वास काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (शुक्रवार) व्यक्त केला. तसेच या सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
2018-19 या वर्षासाठी केंद्रीय अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात आंध्र प्रदेशातील जनतेसाठी सरकारने कोणत्याही योजना, निधी दिला नसल्याने नाराज तेलुगू देसम पक्षाने (टीडीपी) सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आता राहुल गांधींनी आंध्रला विशेष दर्जा देण्याबाबत पाठिंबा असल्याचे वक्तव्य केले.
ते म्हणाले, आंध्र प्रदेशातील जनतेकडून राज्याला विशेष दर्जा देण्याबाबत मागणी केली जात आहे. याशिवाय येथील पोलावरम प्रकल्पाच्या मागणीसाठी काँग्रेसचा पाठिंबा असेल. त्यामुळे हे करण्यासाठी आता सर्व पक्षांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे. या सर्वासाठी आणि न्यायासाठी आपला पाठिंबा हवा, असे आवाहन राहुल यांनी ट्विटवरुन केले.
दरम्यान, आंध्र प्रदेशसाठी केंद्राकडून अपुरा निधी मिळाल्यासंदर्भात तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) नेते व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पुन्हा एकदा तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.