'ती' रडली दुधासाठी आईने चिरला गळा
''जेव्हा बालिका रडत होती. तेव्हा त्या बालिकेची आई स्वयंपाकगृहात काम करत होती. बालिकेच्या सततच्या रडण्याने तिची आई प्रचंड संतापली आणि या संतापाच्या भरातच तिने बालिकेचा गळा चिरून हत्या केली''.
- पोलिस अधिकारी सी. बी. सिंह
धार : एक वर्षीय बालिका दुधासाठी सतत रडत असल्याने तिच्या जन्मदात्या आईनेच तिचा गळा चिरून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. ही घटना मध्यप्रदेशातील धार गावात घडली. या घटनेनंतर त्या बालिकेच्या आईला काल (गुरुवार) पोलिसांनी अटक केली.
जेव्हा ही घटना घडली त्यावेळी घटनास्थळी कोणीही उपस्थित नव्हते. त्या महिलेच्या शेजारच्या लोकांना बाळाचा कोणताही आवाज न आल्याने त्यांना संशय आला आणि त्यांनी परिसरात लक्ष दिले. त्यावेळी संबंधित महिला घराला कुलूप लावून त्या बालिकेशिवाय बाहेर जाताना दिसली. त्या महिलेने शेजाऱ्यांना नातेवाईकांकडे जात असल्याचे सांगितले. नंतर ती महिला निघून गेली.
त्यानंतर त्या महिलेचा आणखी एक नातेवाईक आला आणि त्याने घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर बालिका रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तो भयभीत झाला. त्याने याबाबतची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी याप्रकरणी संबंधित महिलेस अटक केली.
''जेव्हा बालिका रडत होती. तेव्हा त्या बालिकेची आई स्वयंपाकगृहात काम करत होती. बालिकेच्या सततच्या रडण्याने तिची आई प्रचंड संतापली आणि या संतापाच्या भरातच तिने बालिकेचा गळा चिरून हत्या केली'', अशी माहिती पोलिस अधिकारी सी. बी. सिंह यांनी दिली.