आरटीओ अधिकाऱ्यांची परिवहनमंत्र्यांकडून कानउघाडणी
चिखली - पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहन निरीक्षकांच्या खासगी दलालराज बाबत परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी शुक्रवारी परिवहन अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.
चिखली - पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहन निरीक्षकांच्या खासगी दलालराज बाबत परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी शुक्रवारी परिवहन अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.
परिवहन कार्यालयात दलालांना मज्जाव करावा, असा उच्च न्यायालयाचा आदेश आहे. त्यावर पिंपरी-चिंचवड कार्यालयातील सहायक वाहन निरीक्षकांनी उपाय शोधून पैसे गोळा करण्यासाठी खासगी दलालांची नेमणूक केली आहे. हे दलाल मनमानी पद्धतीने नागरिक आणि ड्रायव्हिंग स्कूलचालकांकडून पैसे उकळत आहेत. याबाबत ‘सकाळ’च्या शुक्रवारच्या अंकात ‘आरटीओत आर्थिक लूट’ या शीर्षकाखाली सविस्तर वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. शुक्रवारीच परिवहनमंत्री एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आले होते. तेव्हा शिवसेना नेत्या सुलभा उबाळे यांनी ‘सकाळ’चा अंक दाखवून परिवहन कार्यालयातील गैरप्रकारांचा पाढाच वाचला. परिवहन कार्यालयातील अधिकारी नागरिकांशी उद्धट वागतात. ही गोष्ट वरिष्ठांच्या कानावर घातल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष केले जाते, असे उबाळे यांनी परिवहनमंत्र्यांना सांगितले. त्यानंतर रावते यांनी परिवहन अधिकाऱ्यांना बोलावून त्यांची कानउघाडणी केली.
अन्यथा आंदोलन - सुलभा उबाळे
परिवहन कार्यालयातील अधिकारी नेमलेल्या दलालांमार्फत आर्थिक पिळवणूक करतात. हे दलाल मनमानी पद्धतीने नागरिकांकडून पैसे उकळतात. तसेच अधिकारी व त्यांनी नेमलेले दलाल नागरिकांशी उद्धटपणे वागतात. या प्रकारात बदल न झाल्यास, आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सुलभा उबाळे यांनी परिवहन अधिकाऱ्यांना एका पत्रकाद्वारे दिला आहे.