चंद्रतालची काळरात्र
हिमालयातील ट्रेकची सवय हे एक व्यसनच आहे. मृत्यूच्या जवळ जाऊन परतल्यानंतरही हिमालयाची ओढ स्वस्थ बसू देत नाही. जुन्या आठवणी सांगत नव्याने ट्रेक आखले जातात.
हिमालयातील ट्रेकची सवय हे एक व्यसनच आहे. मृत्यूच्या जवळ जाऊन परतल्यानंतरही हिमालयाची ओढ स्वस्थ बसू देत नाही. जुन्या आठवणी सांगत नव्याने ट्रेक आखले जातात.
त्या रात्रीची आठवण झाली, की आजही अंगावर काटा उभा राहतो. जुलै 1983. मनाली-रोहतांग पास असा बस प्रवास करून आमची तुकडी चिक्का या ठिकाणी उतरली. सोबत तंबू आणले होते. चिक्काला पहिला मुक्काम. आता आमचा प्रवास चिक्का ते छत्रू, छत्रू ते छोटा दरा व छोटादरा ते बातल असा तीन दिवसांत पूर्ण झाला. चार दिवसांच्या पायपिटीने आता ओझ्याचा आणि विरळ हवेचा सराव झाला होता. बातल ते चंद्रताल हा प्रवास चढणीचा होता. अंतर होते 17 किलोमीटर आणि उंची गाठावयाची होती 14100 फूट. आम्ही सर्व जण तीनच्या सुमारास चंद्रतालला पोचलो. वाटेत फक्त एक मेंढपाळांचा जथा भेटला होता. चंद्रताल म्हणजे नितळ पाण्याचे सरोवर. सर्व बाजूंनी डोंगरांनी वेढलेले. मध्ये बशीसारखे. पाणी अतिशय थंड आणि स्फटिकासारखे स्वच्छ, की पाण्याचा तळ दिसत होता. सर्व जणांनी आपले तंबू ठोकून बिछाने लावले. स्टोव्ह पेटले आणि चहाचे आधण स्टोव्हवर चढले.
इतक्यात आमचे सर्वांचे काका "जय हो' हातात मग घेऊन येताना दिसले. काय काका काय झाले अशी विचारणा झाली. पोट बिघडले, बेसनाचे लाडू बाधले असावेत, अशी शंका व्यक्त केली. थोडासा गरम चहा घ्या, बरे वाटेल. काकांनी चहा घेतला. त्यानंतरच्या तासाभरात काकांच्या आठ ते दहा फेऱ्या झाल्या. आता काकांच्या चेहऱ्यावर थकवा दिसत होता. प्रसंग बाका होता. आमच्या प्रथमोपचार पेटीतील औषधे काढली. त्यातील जुलाब बंद होण्याच्या गोळ्या दिल्या. त्याच बरोबर गरम पाण्यात इलेक्ट्रॉल घालून पिण्यास दिले. सात वाजण्याच्या सुमारास स्वयंपाक तयार झाला होता. परंतु सर्वांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे चिंतेचे सावट होते. काकांच्या फेऱ्या चालूच होत्या आणि दर फेरी गणिक थकवा वाढत होता. आठच्या सुमारास काकांना ग्लानी येऊ लागली. नेहमी आनंदी असणारे काका निरवानिरवीची भाषा करू लागले. आमच्या तोंडचे पाणी पळाले होते. मनुष्यवस्तीपासून अति दूर, कोणतीही वैद्यकीय सोय जवळपास उपलब्ध नाही.
प्रथम काकांची झोपण्याची सोय एका तंबूत केली. जुलाबाचे प्रमाण कमी झाले होते. परंतु थकवा अतिशय आला होता. त्यांना एक स्लिपिंग बॅगेत झोपवले. सोबत मी, सुधीर आणि एकजण तंबूत जागत बसणार होतो. काकांना जागते ठेवणे आणि डीहायड्रेशन होऊ नये म्हणून सतत इलेक्ट्रॉलचे पाणी तोंडाने देणे आवश्यक होते. बरोबरच्या थर्मासमध्ये गरम पाणी भरले. सर्व इलेक्ट्रॉलची पाकिटे गोळा केली. पाण्यासाठी मग, चमचा अशी तयारी करून तंबूत बसलो. काकांना शेकण्यासाठी गरम पाण्याची पिशवी दिली होती. काकांनी मला त्यांचे डोके मांडीवर घेण्यास सांगितले. त्यांची निरवानिरवीची बडबड चालू होती. मनात एक प्रकारची भीती असून ती न दाखविता काकांना धीर देण्याचे काम, तसेच त्यांना जागे ठेवण्याचे काम चालू होते. पूर्वीच्या ट्रेकमधील गमतीदार प्रसंग सांगून मनावरील ताण कमी करण्याचा व प्रसंगातील गंभीरता कमी करण्याचा प्रयत्न चालू होता. रात्र हळूहळू चढत होती. मधूनच आमचे इतर ट्रेकर तंबूकडे येऊन आता तब्येत कशी आहे, अशी खुणेनेच चौकशी करीत होते. परमेश्वराचा धावा करीत आम्ही काकांना एक एक चमचा इलेक्ट्रॉलचे पाणी पाजीत होतो. सतत बोलून झोप घालविण्याचा प्रयत्न चालू होता. बोलता बोलता काकांना झोप लागली. झोपेतच ते काही बोलत होते व दिलेले पाणी निमूटपणे घेत होते.
अखेर एकदाची ती रात्र संपली. काकांचे डोके माझ्या मांडीवर असल्यामुळे मांडी आखडली होती. मांडीची हालचाल होताच काकांना जाग आली. काकांनी हळूच डोळे किलकिले करीत पाहिले आणि त्यांनी मला चिमटा काढण्यास सांगितले. चिमटा काढताच काळझोपेतून जाग आली असे काका म्हणाले. त्यांचा चेहरा आता बराच टवटवीत दिसत होता. जे घडले ते रात्रीचे एक स्वप्न असावे असे वाटले. काकांची तब्येत छान असल्याचे वृत्त कॅंपमध्ये पसरल्याने आनंदाचे वातावरण पसरले. कॅंपची आवराआवर करून आता परत मनालीस जाण्याचा बेत आबा महाजनानी जाहीर केला. ट्रेकमधील पुढील टप्पे अवघड आणि चढावाचे असल्याने हा निर्णय घेतला असल्याचे आबांनी सांगितले. रोजच्या प्रमाणे प्रार्थनेसाठी आम्ही सर्वजण गोल करून उभे राहिलो. काका पण प्रार्थनेसाठी उभे राहिले. सर्वांनी मोठ्या श्रद्धेने प्रार्थना पूर्ण केली. कालच्या कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यास परमेश्वराचे सहाय्य मिळाल्याचे प्रार्थनेत दिसून येत होते. आठच्या सुमारास आमचा चंद्रताल ते बातल असा परतीचा प्रवास सुरू झाला. काकांना घोड्यावर बसण्याचा आग्रह झाला. परंतु त्यांनी आमच्या बरोबर पायी येण्याचा हट्ट धरला. त्यांचे सामान घोड्यावर टाकून काका आमच्या सोबत बातलपर्यंत हळूहळू आले. काकांचे हिमालयातील ट्रेक अजूनही चालू आहेत.