रायगड - जांभूळपाड्यातील अंगणवाडयांमध्ये 33 टक्के कुपोषित मुले
पाली (रायगड) : मुंबई येथील डॉक्टर्स फॉर यु या संस्थेने केलेल्या पाहणीत सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा परिसरातील अंगणवाडयांमध्ये ३३ टक्के कुपोषित मुले आढळून आली आहेत. यामध्ये २१ मुले ही तीव्र कुपोषित अाहेत. असे डीएफवाय संस्थेच्या संचालिका डॉ.वैशाली वेणू यांनी सकाळला सांगितले.
पाली (रायगड) : मुंबई येथील डॉक्टर्स फॉर यु या संस्थेने केलेल्या पाहणीत सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा परिसरातील अंगणवाडयांमध्ये ३३ टक्के कुपोषित मुले आढळून आली आहेत. यामध्ये २१ मुले ही तीव्र कुपोषित अाहेत. असे डीएफवाय संस्थेच्या संचालिका डॉ.वैशाली वेणू यांनी सकाळला सांगितले.
भारतीय बालरोगतज्ज्ञ परिषदेच्या शिफारसी नुसार अंगणवाडी योजनेत मुलांची वजने घेऊन वयाप्रमाणे हिशोब करुन वजन कमी, जास्त, योग्य असे मापदंड लावून ही पाहणी करण्यात आली आहे. मुलांची आरोग्य तपासणी मोहीम अंतर्गत सात अंगणवाड्यांतील ९५ मुलांची तपासणी केली गेली. यात ३२ मुले कुपोषित आढळली त्यात २१ मुले ही तीव्र कुपोषित तर ११ मुले मध्यम कुपोषित आहेत. संस्थेच्या वतीने या कुपोषित बालकांना त्या त्या प्रकारची अन्न पाकिटे वाटण्यात आली आहेत. या मुलांमध्ये होणारी सुधारणा यावर आमचे डॉक्टर लक्ष ठेऊन आहेत. या शिवाय डोळे, दात, एचबी आदी तपासणी करण्याबरोबर ओपीडी सुरु करून ग्रामस्थांना आरोग्याच्या सुविधा देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे आहे असे डॉ. वैशाली वेणू यांनी सांगितले.
डॉ. रविकांत सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली डीएफवाय संस्था सर्वांसाठी आरोग्य या दृष्टिकोनातून काम करीत आहे. जांभूळपाडा विभागात सुरु असलेल्या आरोग्य मोहिमेबाबत बोलतांना डीएफवाय संस्थेच्या संचालिका डॉ. वैशाली वेणू म्हणाल्या की संस्थेने जांभूळपाडा, वऱ्हाड, घोड्पापड,गाठेमाळ, दांड कातकरवाडी, हेदवली, करचुंडे या गावातील अंगणवाडी सुधार प्रकल्प हाती घेतला आहे. यामध्ये अंगणवाडीची दुरुस्ती, रंगकाम आणि पाण्याची सोय, मुलांच्या इतर सोय सुविधा पूर्ण करणार असून या प्रकल्पाची पहिली अंगणवाडी पूर्ण झाली आहे. मार्च महिन्याच्या उर्वरित सर्व अंगणवाडी पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी गटविकास अधिकारी विनायक म्हात्रे म्हणाले की, ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामस्थ आणि मुलांपर्यंत डीएफवाय संस्था आणि त्यांचे डॉक्टर पोहचून मुलभूत सोयीसुविधा पुरवित आहेत. शासनाच्या विविध योजना सुद्धा ग्रामीण भागात सुरु असतात त्यांना या संस्थेच्या कार्यातून नक्कीच हातभार लागतो. अंगणवाडी दुरुस्ती हा प्रकल्प सुधागड तालुक्यातील इतर आदिवासी भागात सुद्धा राबवावा अशी सूचना यावेळी विनायक म्हात्रे यांनी केली.
डीएफवाय संस्थेच्या वतीन नुकतेच जांभूळपाडा वऱ्हाड येथील अंगणवाडीतील मुलांना शालेय गणवेश व हायजीन कीट वाटपाचा कार्यक्रम झाला. विद्यार्थ्यांना गणवेश व ब्रश,कंगवा, नेल कटर, साबण आणि टंग क्लीनर अशा वस्तू असलेला हायजीन कीट मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. या कार्यक्रमाला गटविकास अधिकारी विनायक म्हात्रे, सहाय्यक गटविकास अधिकारी शंकर कवित्वके, डीएफवायच्या संचालिका डॉ. वैशाली वेणू, कार्यक्रम अधिकारी अश्वेंद्र कुमार व आदी मान्यवर उपस्थित होते.