शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळणार
जुन्नर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा ज्या शेतकऱ्यांना अद्यापही लाभ मिळाला नाही त्यांनी त्यांच्या बँक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन जुन्नरच्या सहाय्यक निबंधक यशवंती मेश्राम यांनी केले आहे.

या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना बँकेच्या माहितीच्या आधारे लाभ देण्यात आला आहे. परंतु काही शेतकऱ्यांची माहिती बँकेकडून प्राप्त झालेल्या कर्ज खात्याच्या माहितीशी जुळत नाही यामुळे अशा शेतकऱ्यांना लाभ मिळू शकला नाही. कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज करूनही ज्या शेतकऱ्यांची नावे ग्रीन यादीत आली नाहीत त्यांनी कर्ज घेतलेल्या बँक शाखेशी संपर्क साधून त्रुटींची पूर्तता करावी व अचूक माहिती बँक शाखेत सादर करावी.
तालुकास्तरीय पडताळणी समिती मार्फत त्रुटींची पडताळणी करून कर्जमाफी बाबत उचित निर्णय घेण्यात येणार आहे. सहाय्यक निबंधकाच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे. यात जिल्हा बँकेचे उपविभागीय अधिकारी, विकास अधिकारी, बँक प्रतिनिधी तसेच सदस्य साची म्हणून सहकारी संस्थेचे लेखा परीक्षक काम पाहणार आहेत. अर्ज करूनही लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांनी बँकेस अद्यावत माहिती दिल्यानंतर बँकेने आपल्या अभिप्रायासह तालुका समितीकडे ऑनलाईन सादर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी कळविले आहे.