राहुल गांधी माझे बॉस : सोनिया गांधी
''आता आम्हाला नवा काँग्रेस अध्यक्ष मिळाला आहे. त्यामुळे माझ्याकडून नवे अध्यक्ष राहुल गांधींना शुभेच्छा आहेत. ते आता काँग्रेस अध्यक्ष असल्याने माझे बॉस आहेत. त्याबाबत कोणतीही शंका नाही''.
- सोनिया गांधी, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा
नवी दिल्ली : सोनिया गांधी यांनी अध्यक्षपदाची सूत्रे त्यांचे पुत्र आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष यांच्याकडे सोपवल्यानंतर त्यांनी पक्षातील सर्व अधिकार राहुल गांधींना दिले आहेत. त्याबाबत सोनिया म्हणाल्या, ''राहुल गांधी आता माझे बॉस आहेत. यात काहीही शंका नाही''.
काँग्रेसच्या संसदीय नेत्यांच्या बैठकीनंतर 'एएनआय'शी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. त्या म्हणाल्या, ''आता आम्हाला नवा काँग्रेस अध्यक्ष मिळाला आहे. त्यामुळे माझ्याकडून नवे अध्यक्ष राहुल गांधींना शुभेच्छा आहेत. ते आता काँग्रेस अध्यक्ष असल्याने माझे बॉस आहेत. त्याबाबत कोणतीही शंका नाही, असे त्या म्हणाल्या.
यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार जास्तीत जास्त प्रसिद्धी, किमान सरकार आणि जास्तीत जास्त जाहिरातबाजी व कमीत कमी वितरण, असे धोरण या सरकारचे आहे.
दरम्यान, सोनियांनी नुकत्याच झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले. ''आमच्या पक्षाने गुजरात विधानसभा आणि राजस्थान पोटनिवडणुकीत मोठी कामगिरी केली. हे सर्व परिवर्तवनाची लाट असल्याचे दिसत आहे. मला विश्वास आहे, की कर्नाटकात काँग्रेसला उभारी मिळून हे पुन्हा अधोरेखित होईल'', असेही त्या म्हणाल्या.