शिवसेना बाहेर पडली तरी धोका नाही - प्रसाद लाड
शेतकऱ्यांची कर्जमाफी ऑनलाईन झाल्यामुळे विरोधकांच्या चोऱ्या बंद झाल्याने ते हल्लाबोल करताहेत. शिवसेना विकासासाठी कधीही भांडताना दिसत नाही. ते सत्तेतून बाहेर पडले तरी २०१९ पर्यंत सरकारला कोणताही धोका नाही, असे ठाम प्रतिपादन विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी केले.
रत्नागिरी - काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी हे पक्ष प्रायव्हेट लिमिटेड आहेत. मात्र, भाजप हा निष्ठावान, प्रामाणिक कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. शिवसेना राज्यात सत्तेत असला तरी तो विरोधी पक्षासारखे वागतोय. शेतकऱ्यांची कर्जमाफी ऑनलाईन झाल्यामुळे विरोधकांच्या चोऱ्या बंद झाल्याने ते हल्लाबोल करताहेत. शिवसेना विकासासाठी कधीही भांडताना दिसत नाही. ते सत्तेतून बाहेर पडले तरी २०१९ पर्यंत सरकारला कोणताही धोका नाही, असे ठाम प्रतिपादन विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी केले.
आमदार झाल्याबद्दल त्यांचा भाजपच्या जिल्हा संपर्क कार्यालयात सत्कार झाला. त्यानंतर ते बोलत होते. या वेळी बंदर राज्यमंत्री आणि रायगड जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री रवींद्र चव्हाण प्रमुख उपस्थित होते.
श्री. लाड म्हणाले, ‘‘कोकण म्हणजे जहागिरी अशा पद्धतीने शिवसेना वागत आहे. विकासाच्या मुद्द्यावर सेना काय करते? स्वबळावर लढून मुख्यमंत्र्यांनी भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आणले. रत्नागिरी जिल्ह्यात विकासासाठी आमदार निधी, उद्योगांचा सीएसआर निधी आणि गरज पडल्यास मुख्यमंत्री विशेष साह्य निधी आणू. भाजपमध्ये निष्ठावान कार्यकर्ते जीवाचे रान करीत आहेत. आगामी निवडणुकीत जिल्ह्यात भाजपचे ५ आमदार निवडून आणू.’’
राज्यमंत्री चव्हाण म्हणाले, ‘‘राजेश सावंत यांच्यासारखे प्रामाणिक पन्नास कार्यकर्ते मिळाले की जिल्ह्यात शत-प्रतिशत भाजप व्हायला वेळ लागणार नाही. आमदार, खासदार नाही म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्वस्थ न बसता स्वतः आमदार असल्याप्रमाणे कामाला लागावे. शासकीय योजनांचा लाभ, डिजिटल इंडियामार्फत सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. आपले सरकार सारख्या विविध ॲपद्वारे आपण समस्या मांडू शकतो. पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांशी संवाद साधू शकतो. नेटमुळे पंतप्रधान सर्वांना जवळ आले आहेत. भारत नेटद्वारे ग्रामपंचायती ऑनलाइन होत आहेत. त्याचा फायदा घ्या.’’
या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने, प्रा. नाना शिंदे, माजी उपनगराध्यक्ष राजेश सावंत, सचिन वहाळकर, दत्ता देसाई, प्रशांत डिंगणकर, उमेश कुळकर्णी, बाबा परुळेकर, सोनुभाऊ कळंबटे आदी उपस्थित होते.
शिवसेनेवाले पक्के चोर...
शिवसेनेवाले पक्के चोर असल्याची टीका राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली. आरोग्य खाते शिवसेनेकडे आहे. डॉक्टर्सच्या उपलब्धतेसाठी ते काही करू शकत नाहीत आणि केवळ ओरडत बसतात. नेटद्वारे टेलिमेडिसिन देण्याचे काम नर्सही करू शकतात, अशी व्यवस्था माझे माहिती तंत्रज्ञान खाते करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.