जनता २०१९ ला भाजपला घरी बसवेल - अमित देशमुख
२०१९ च्या निवडणुकीत भाजपला घरी बसवेल. त्यासाठी आतापासूनच निवडणुकीच्या कामाला लागा. येणारा काळ आपला असून, पी. एन. यांना विधानसभेत पाठवा, असे आवाहन आमदार अमित देशमुख यांनी केले आहे.
कसबा बीड - भाजपचे सरकार सामान्य जनता व शेतकऱ्यांच्या उपयोगी पडलेले नाही. त्यांचा चार वर्षांचा काळ हा महागाई व सामाजिक ऐक्य बिघडवणारा ठरला आहे. त्यामुळे जनता येत्या २०१९ च्या निवडणुकीत भाजपला घरी बसवेल. त्यासाठी आतापासूनच निवडणुकीच्या कामाला लागा. येणारा काळ आपला असून, पी. एन. यांना विधानसभेत पाठवा, असे आवाहन आमदार अमित देशमुख यांनी केले आहे.
बीडशेड येथील श्रीपतदादा बॅंक, कसबा बीड येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची नूतन इमारत व महे येथील भैरवनाथ विकास सेवा संस्थेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते शेतकरी मेळाव्यात बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार पी. एन. पाटील होते.
आमदार देशमुख म्हणाले, ‘‘अच्छे दिन सरकारचे आहेत; मात्र सामान्य जनता उपाशीपोटी झोपते. साखरेचे दर कोसळले तरी सरकारचे डोळे उघडले नाहीत.स्वामिनाथन आयोग लागू करतो म्हणून सत्तेवर आले; पण सामान्य माणसाची येथे चर्चाच होत नाही.’’
माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील म्हणाले, ‘‘भाजपमध्ये शेतकऱ्यांचा माणूस नाही. हे सरकार निव्वळ जाहिरातबाजीचे आहे.’’ माजी खासदार जयवंतराव आवळे म्हणाले, ‘‘गेली १८ वर्षे पी. एन. पाटील जिल्हाध्यक्ष पदावर आहेत, हे त्यांच्या एकनिष्ठतेचे प्रतीक आहे.’’
श्री. पाटील म्हणाले, ‘‘आम्ही युती धर्मानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचा खासदार, आमदार निवडून आणतो; मात्र निवडणुकीत राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष जाहीरपणे शिवसेनेला मते द्या, असे सांगतात. येणाऱ्या निवडणुकीत युती झाली तर ठिकच; नाही तर स्वबळावर लढणार आहे.’’
सांगली जिल्हा शहरप्रमुख पृथ्वीराज पाटील, विशाल पाटील, दिनकरराव जाधव, भरमूअण्णा पाटील, ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील, पी. डी. धुंदरे, बाळासाहेब खाडे, उदय पाटील, जिल्हा परिषद सदस्य राहुल पाटील, सुभाष सातपुते, शिल्पा पाटील, श्रीपतरावदादा बॅंकेचे अध्यक्ष राहुल पाटील, शामराव सूर्यवंशी, करवीरचे उपसभापती विजय भोसले, पंचायत समिती सदस्य राजेंद्र सूर्यवंशी, भोगावतीचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कौलवकर, कृष्णराव किरुळकर, उदयानीदेवी साळुंखे, सज्जन पाटील, महे सरपंच कविता पाटील, गणेशवाडी सरपंच सारिका सुतार, माजी सरपंच सुवर्णा सूर्यवंशी उपस्थित होते. स्वागत सरपंच व ‘गोकुळ’चे संचालक सत्यजित पाटील यांनी केले.