हवालदाराने खबऱ्यांच्या साथीने लाटले ५५ तोळ्यांचे दागिने
पेठवडगाव - दागिने विकण्यासाठी आलेल्या सराफाला चौकशीच्या नावाखाली ताब्यात घेऊन त्याच्याजवळील १७ लाख ३४ हजार रुपये किमतीच्या ५५ तोळे सोन्याची चोरी केल्याप्रकरणी हवालदारासह दोघांवर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या प्रकारामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
पेठवडगाव - दागिने विकण्यासाठी आलेल्या सराफाला चौकशीच्या नावाखाली ताब्यात घेऊन त्याच्याजवळील १७ लाख ३४ हजार रुपये किमतीच्या ५५ तोळे सोन्याची चोरी केल्याप्रकरणी हवालदारासह दोघांवर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या प्रकारामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
याबाबत वरिष्ठांकडे तक्रार केल्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली होती. पेठवडगाव ठाण्याचे हवालदार संदीप शाबा मगदूम (वय ३५, रा. कसबा बावडा), खबऱ्या अनिल डोईफोडे (३२, रा. घुणकी), उदय भानुसे (रा. बुवाचे वाठार) या तिघांवर चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. या तिघांनाही रात्री अटक करण्यात अाली. रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरूच होती.
याबाबत पेठवडगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी ः फिर्यादी साकेत सुनील शहा (वय २३, रा. इस्लामपूर, ता. वाळवा, सांगली) हा आष्टा येथील त्याचा मामा सागर दिलीप शहा यांच्या आष्टा येथील सागर ज्वेलर्स येथे कामास आहे. तो नेहमीप्रमाणे मंगळवारी (ता. ६) विविध प्रकारचे दागिने घेऊन विकण्यासाठी पेठवडगावला मोटारसायकलवरून आलेला होता. तो आष्टाहून चारच्या सुमारास पेठवडगावात आला. येथील सात ते आठ सराफ व्यापाऱ्यांना दागिने दाखवून त्याने व्यवहार केले. त्यानंतर तो परत निघाला होता. तो येथील डॉ. आंबेडकर चौकात सायंकाळी सात वाजता आला. त्यावेळी पाठीमागून मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी त्याला अडविले. पोलिस असल्याचे सांगून ठाण्याकडे चल असे, धमकावत साकेतला ताब्यात घेतले.
यावेळी हवालदार मगदूम व त्यांच्या मागे तोंडास रुमाल बांधलेला एक तरुण होता. त्यांनी पोलिस ठाण्याच्या मागील एका खोलीत साकेतला नेले. तेथे सॅकमध्ये काय आहे, असे विचारले. त्यावर यावेळी दागिने असल्याचे साकेत म्हणाला. त्याने सॅकमधील दागिने काढून टेबलवर ठेवले. त्यानंतर साकेत मालकास फोन करण्यासाठी गेला असता तोंड बांधलेल्या व्यक्तीने वीज घालवली. यावेळी दुसरी अनोळखी व्यक्ती तेथे आली.
दरम्यान, रात्री अकरा वाजता हवालदार संदीप मगदूम यांनी दागिन्याची बॅग हातात दिली. यावेळी साकेत दागिन्याची बॅग घेऊन पोलिस ठाण्यात गेला.
तेथे सॅकमधील साहित्याचा पंचनामा केला असता तीन किलो सोन्याच्या दागिन्यापैकी पंचाव्वन्न तोळे सोने कमी असल्याचे निदर्शनास आले. यातील सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे उघड झाले. यानंतर साकेत व त्याच्या नातेवाईकांनी थेट विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे तक्रार केली. यानंतर तपासाची चक्रे फिरली. याबाबत वरिष्ठांच्या सांगण्यावरून पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी पेठवडगाव पोलिस ठाण्यात येऊन चौकशी केली आणि हवालदारासह तिघांवर गुन्हा दाखल केला. त्यांनी केलेल्या चौकशीनंतर तिघांपैकी उदय भानुसे याच्याकडे चोरीला गेलेले दागिने मिळाले आहेत. ते पोलिसांनी हस्तगत केले.
या सराफास चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याजवळ सॅकमध्ये विविध प्रकारचे तीन किलोचे सोन्याचे दागिने होते. यावेळी टीप देणाऱ्या दोघांपैकी एकाने वीज बंद करून सोने चोरल्याचे कबूल केले. सराफाकडे रिव्हॉलव्हर असल्याची बातमी होती; परंतु त्याच्याकडे सोने निघाले. सोन्याकडे बघून लालसा निर्माण झाल्याचे निदर्शनास आले.
नांगरे-पाटील यांच्याकडे तक्रार; सूत्रे हलली
साकेत व त्याच्या नातेवाईकांनी थेट विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे तक्रार केली. यानंतर तपासाची चक्रे फिरली. याबाबत वरिष्ठांच्या सांगण्यावरून पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी पेठवडगाव पोलिस ठाण्यात येऊन चौकशी केली व कारवाई सुरू झाली.